Balasaheb Thorat, Manoj Jarange Patil News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation : शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून मराठा समाजाची अवहेलना; थोरातांचा हल्लाबोल

Amol Jaybhaye

Ahmednagar News : "मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात आंदोलकांवर लाठीचार्ज का केला हे अजून उमगलेले नाही. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे लोकमानस तयार झाले आहे, हे शिंदे-फडणवीस-पवार यांचे सरकार समजून घेण्यास तयार नाही. सरकारने गठीत केलेल्या आरक्षण समितीची गेल्या दीड वर्षात एकही बैठक नाही. यातून फक्त मराठा समाजाची अवहेलना झाली आहे", अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली.

बाळासाहेब थोरात नगर शहरात होते. यानिमित्ताने त्यांनी माध्यमांशी संवाद झाला. काँग्रेसचे (Congress) शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, मनोज गुंदेचा, संजय झिंजे, मंगल भुजबळ उपस्थित होते. थोरात म्हणाले, "मराठा समाजाच्या आरक्षणावर मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर लोकमानस तयार झाला आहे. त्यांच्या सभेअगोदर लोक सभास्थळी गर्दी करत आहेत. असे असताना आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून गांभीर्याने प्रयत्न होताना दिसत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

यासाठी गठीत केलेल्या समितीची दीड वर्षे एकही बैठक नाही. या समितीत सरकारचे मंत्री, अध्यक्ष, नेते आहेत. पण, संवाद नाही. जरांगे पाटील आंदोलनाला बसेपर्यंत बैठकच न होणे, ही मराठा समाजाची अवहेलनाच आहे. तोपर्यंत सरकारने समाजाला ग्राह्य धरले होते. काही होत नाही, अशी भावना सरकारने करून घेतली होती. आता पुन्हा जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यातून समाधानकारक मार्ग काढावा, ही सरकारचीच जबाबदारी आहे, असे थोरात यांनी म्हटले आहे.

अनेक प्रश्न आहेत. परंतु कोणते विषय प्राधान्याने सोडवले पाहिजेत, यावर राज्य सरकार काम करायला तयार नाही. ही यादीच राज्य सरकारकडे नसावी, याचे कारण काय, हे काळजी वाटण्यासारखेच आहे, असेही थोरात म्हणाले.

धनगर समाजाची फसवणूक

राज्य सरकारमध्ये मीदेखील काम केले आहे. काम करताना कधीही खोटे आश्वासन दिले नाही पाहिजे. 2014 मध्ये धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. त्यावेळी पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेतो, असे आश्वासन दिले गेले होते. या आश्वासनाचे काय झाले. हे आश्वासन खोटे ठरले. धनगर समाजाची फसवणूक झाली. हे करण्याची गरज काय ?, असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला. सर्व घटक समाजाचा सामावून घेण्याची जबाबदारी असल्याचेही थोरात म्हणाले.

युवकांनो टोकाचे पाऊल उचलू नका

मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) मराठा समाजातील युवकांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर येत आहेत. हा त्यातील मार्ग नाही. हा प्रकार दुर्दैवी आहे. लढा उभारला आहे, तर त्याला महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गाने लढावा. सत्याग्रह करावा. मात्र, आत्महत्या हा मार्ग नाही, असेही थोरात यांनी म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT