PMPL Chief Singh Transfer News : पुण्यातील ‘पीएमपीएमएल'च्या व्यवस्थेला मार्गावर आणण्यासाठी काही वर्षांपूर्वी आयएएस श्रीकर परदेशींना आणलं गेलं. त्यानंतर काही वर्षांत ‘डॅशिंग’ तुकाराम मुंडेंनाही बोलावलं.
पुणे पालिका हादरवून सोडणारे ओमप्रकाश बकोरियाही ‘पीएमपी’त आले. पण, हे धडाकेबाज अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या पचनी न पडल्याने त्यांना तडकाफडकी बदलण्यात आले. बकोरियांची बदली होताच आणखी एक दमदार अधिकारी म्हणजेच सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे ‘पीएमपी'चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपद सोपविण्यात आले. (PMP President Sachindra Pratap Sinh was transferred in just four months)
सिंह यांनी मध्यरात्रीपर्यंत...तर कधी पहाटेपासून ‘पीएमपी’ मार्गावर फिरून ऑपरेशन केले. सत्ताधाऱ्यांच्या बळावर पीएमपी रुतविणाऱ्या अधिकऱ्यांना जमिनीवर आणले. अशा सिंह यांची शिंदे-फडणवीस-पवार सरकारने आज (ता. २३ ऑक्टोबर) अवघ्या चार महिन्यांत बदली केली.
त्यातून सरकारला पुण्यातील ‘पीएमपी’ व्यवस्था टिकवून ठेवायची नाही, असाच मेसेज गेला. शिंदे-फडणवीस आणि अजितदादांचे कान भरून काही ठेकेदार आणि नेत्यांनी सिंह यांची बदली करण्यास भाग पाडल्याचे स्पष्ट आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कर्मचारी, ठेकेदार तसेच ‘पीएमपी’च्या बसचालकांना वठणीवर आणण्यासाठी टॉप गिअर टाकणाऱ्या सिंह यांची बदली केल्यामुळे कारवाईचा बडगा उगारणाऱ्या अधिकाऱ्याच्या तडकाफडकी बदल्या कशा होतात आणि या बदली करण्यामागे कोणती ताकद काम करते, याविषयी आता चर्चा रंगत आहे.
यापूर्वी अवघ्या नऊ महिन्यांत तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांची बदली करून सिंह यांची या पदावर नेमणूक करण्यात आली होती. मात्र, आता अवघ्या चार महिन्यांमध्ये सिंह यांचीही बदली करून त्यांच्या जागी एस. जी. कोलते (भा.प्र.सेवा) यांची नियुक्ती करण्यात आली.
सचिंद्र प्रताप सिंह यांची दिव्यांग कल्याण आयुक्त, पुणे या पदावर बदली करण्यात आली आहे. सरकारच्या सामान्य प्रशासन विभागातील अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी या संदर्भातील आदेश सोमवारी काढले आहेत.
सिंह यांनी पीएमपी’चा पदभार स्वीकारल्यापासून ‘पीएमपी’ला मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांनी त्यांच्या काळात ‘पीएमपीएमएल’ मध्ये यूपीआय क्यूआर कोड तिकीट यंत्रणा सुरू केली. ‘पीएमपी’चा नफा वाढविण्याआधी त्यांनी तोट्यात असणारे मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ठेकेदारांच्या लांब पल्ल्यांच्या मार्गावरच्या बस बंद केल्या. परिणामी ‘पीएमपी’च्या खर्चात बचत होत राहिली. मात्र, ‘पीएमपी’च्या ठेकेदारांचे मात्र नुकसान होत गेले.
अशाच प्रकारचे निर्णय घेणाऱ्या बकोरिया यांचीही मुदतीपूर्वी बदली केली होती. त्यामुळे अशी कोणती ताकद आहे, जी ‘पीएमपीएल’ च्या ठेकेदारांना, अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वठणीवर आणणाऱ्या अधिकाऱ्याची तत्काळ बदली होते, असा प्रश्न सामान्यांकडून विचारला जात असल्यामुळे राज्य सरकारच्या ध्येयधोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
काय सांगतो पीएमपीएलच्या अध्यक्षांचा इतिहास?
पीएमपी’च्या इतिहासात आतापर्यंत अध्यक्षपदाचा कार्यकाळ केवळ दोन अधिकाऱ्यांनीच पूर्ण केला आहे. यामध्ये आर. एन. जोशी (तीन वर्षांहून अधिक) आणि नयना गुंडे (२९ महिने) यांचा समावेश आहे. सर्वांत कमी काळ अश्विनीकुमार यांचा राहिला आहे.
ते तीन महिने पदावर होते. आता त्याच्यापाठोपाठ सचिंद्र प्रताप सिंह यांचा नंबर लागला आहे. गेल्या पाच वर्षांत ‘पीएमपीएल’ने सात अध्यक्ष पाहिले आहेत, यापैकी कुणालाही आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही, त्यामुळे पीएमपीएलचा विकास खुंटला असल्याचे मत ‘पीएमपीएल’ चे तज्ज्ञ सांगतात.
त्यांचा हा किस्सा पुणेकरांना नेहमी लक्षात राहील
विश्रांतवाडी येथील बस स्टॉपवर काळा टी शर्ट घातलेली एक व्यक्ती पुणे स्टेशनला जाणारी बस थांबवण्याचा प्रयत्न करते. मात्र, बस थांबत नाही. त्यांच्याही नशिबी सामान्य प्रवाशांना नेहमी येणारा अनुभव येतो...त्यानंतर ती व्यक्ती बसच्या मागे धावण्यास सुरुवात करते...बस भरलेली नसतानाही चालक ती तशीच दामटतो... बस काही अंतरावर पुढे जाते आणि चालकाला आणि वाहकाला एक अनपेक्षित आणि मोठा धक्का बसतो.
मागील थांब्यापासून बसच्या मागे धावणारी व्यक्ती दुसरी, तिसरी कुणी नसून, ‘पीएमपी’चे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह असल्याचे त्यांच्या लक्षात येते आणि त्यांचे चेहरे पडतात. त्या चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जातो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.