Kirit Somaiya News: भाजप नेते किरीट सोमय्या मंगळवारी मालेगावला आले होते. यावेळी त्यांनी पुन्हा अडतीस जणांची यादी तहसीलदारांना दिली. यावेळी न्यायालयात बोगस दाखले दिल्याचा आरोप असलेल्या संशयितांची सुनावणी झाली.
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सध्या मालेगाव शहराला टार्गेट केले आहे. या शहरात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिम राहतात असा त्यांचा दावा आहे. प्रत्यक्षात मात्र याबाबत न्यायालयात दाखल असलेल्या दाव्यामध्ये बांगलादेशी अथवा रोहिंग्या असा कुठेही उल्लेखच केलेला नाही.
यासंदर्भात सोमय्या यांनी काल पुन्हा एकदा मालेगावच्या तहसीलदारांना ३८ बोगस दाखले असल्याची नावे दिली आहेत. त्यांची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी त्यांनी मागणी केली होती. याबाबत तहसीलदारांनी त्यांना कारवाईच्या आश्वासन दिले.
मालेगाव येथील न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी यापूर्वीच्या तीन संशयतांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. यासंदर्भात संशयीतांचे वकील ॲड अब्दुल अजीज खान यांनी सोमय्या आणि पोलिसांवर चांगलीच आगपाखड करीत अनेक प्रश्न उपस्थित केले.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ॲड खान यांनी सोमय्या हे वकील किंवा कायदेतज्ञ नाहीत. राजकीय दबावाचा वापर करून ते प्रशासनाला झुकवत आहेत. पोलीस राजकीय दबावाखाली गुन्हे दाखल करीत आहेत. पोलिसांकडे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा केला.
ते म्हणाले, किरीट सोमय्या हा मूर्ख माणूस आहे. बांगलादेशी अथवा रोहिंग्या मुसलमान असतील तर ते हवेत उडून आलेले आहेत का?. सीमेवर कोण होते? याचा विचार ते का करत नाही? यासंदर्भात चौकशीसाठी विशेष तपासणी पथक नियुक्त केले आहे. या एसआयटी पथकाचे प्रमुख आईजी दर्जाचे अधिकारी आहेत. सोमय्या हे सहाय्यक पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यापेक्षा अधिक जाणकार आहेत का? असा प्रश्न त्यांनी केला.
हे सर्व प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा दावा अॅड खान यांनी केला. ते म्हणाले, मालेगावच्या नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे भाजप चवताळला आहे. त्यातूनच तो असे अनैतिक कामे करत आहे. सोमय्या हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. चार्टर्ड अकाउंटंट कोणते कागदपत्र खरे आणि खोटे हे ठरवू शकतो का? असा प्रश्न त्यांनी केला.
भाजप नेते सोमय्या काल मालेगावला आले होते. यावेळी त्यांनी विविध अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना पुन्हा एकदा कागदपत्रांची यादी दिली. ही कागदपत्रे काय आहेत, हे समजू शकले नाही. मात्र एकंदरच सोमय्या यांना न्यायालयात जबाब देण्यासाठी येताना मालेगावकरांच्या गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागेल, असे चित्र निर्माण झाले आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.