Bhanudas Kotkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhanudas Kotkar : भानुदास कोतकर यांचे निधन; केडगावच्या सरपंचपदापासून अहिल्यानगरच्या राजकारणापर्यंतचा प्रवास

Bhanudas Kotkar, senior Congress leader and former market committee chairman, dies at 74. Read about his political journey and influence in Ahilyanagar : केडगावच्या सरपंचपदापासून काँग्रेसच्या जिल्हास्तरीय नेतृत्वापर्यंत मजल; विलासराव देशमुख यांच्याशी मैत्री, बाजार समितीतील योगदान आणि अशोक लांडे खून प्रकरणामुळे गाजलेली कारकीर्द

Pradeep Pendhare

Bhanudas Kotkar News : काँग्रेसचे ज्येष्ठ स्थानिक नेते, नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास एकनाथ कोतकर (वय 74) यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. अहिल्यानगरच्या राजकारणासह सहकार आणि कृषी क्षेत्रात त्यांनी अनेक वर्षे प्रभाव निर्माण केला होता.

केडगावच्या सरपंचपदापासून सुरू झालेली त्यांची राजकीय वाटचाल पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि काँग्रेसच्या जिल्हास्तरीय नेतृत्वापर्यंत पोहोचली. स्थानिक राजकारणातील त्यांचा प्रभाव, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी असलेली मैत्री आणि कोतकर कुटुंबाचा महापालिकेतील राजकीय प्रवास यांमुळे ते चर्चेत राहिले.

तब्येत खालावल्याने भानुदास कोतकर यांना अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच रुग्णालयात नातेवाईक आणि समर्थकांनी गर्दी केली. त्यांच्या पश्चात पत्नी सुरेखा, मुलगे संदीप, सचिन आणि अमोल, मुलगी सुवर्णा तसेच नातवंडे असा परिवार आहे.

भानुदास कोतकर यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात केडगावमधून झाली. सुरुवातीच्या काळात ते पिठाची गिरणी चालवत असल्याचे स्थानिक जाणकार सांगतात. त्यानंतर त्यांनी केडगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली आणि सरपंचपद (Sarpanch) भूषवले. येथून सुरू झालेल्या त्यांच्या राजकीय वाटचालीला पुढे वेग आला. दिवंगत माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे त्यांना राजकीय पाठबळ मिळाले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चास गटातून यश मिळवले. नगर पंचायत समितीचे सभापती, नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशी विविध पदे सांभाळली. नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर त्यांनी जिल्हा शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली.

काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी 1999 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर नगर-नेवासा विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार शिवाजी कर्डिले यांचा विजय झाला. पुढे कट्टर विरोधक कोतकर-कर्डिले व्याही झाले. राजकीय कारकीर्दीत त्यांचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी जवळचे संबंध निर्माण झाले. विलासराव देशमुख आणि भानुदास कोतकर यांच्यातील संबंध केवळ नेता आणि कार्यकर्ता इतक्यापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांच्यात मैत्रीचे नाते होते, अशा आठवणी अहिल्यानगरमधील जुने जाणकार सांगतात.

विलासराव देशमुख यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर कोतकर अत्यंत भावुक झाले होते. दोन दिवस त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते, अशी आठवण स्थानिक जाणकार सांगतात. राजकारणात स्पष्टवक्तेपणा आणि बेधडक स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोतकर यांची ही भावनिक बाजूही त्या वेळी समोर आली होती. मुंबईतील मंत्रालयात कामानिमित्त गेल्यानंतर मंत्र्यांच्या दालनाबाहेर प्रतीक्षा न करता थेट दालनात प्रवेश करण्याच्या त्यांच्या स्वभावाचे किस्सेही अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात सांगितले जातात.

केडगावपासून महापालिकेच्या राजकारणापर्यंत प्रभाव

अहिल्यानगर नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर आणि शहराची हद्द वाढल्यानंतर केडगावचा महापालिका क्षेत्रात समावेश झाला. त्यामुळे कोतकर यांचा प्रभाव केडगावपुरता मर्यादित न राहता अहिल्यानगर शहराच्या पुढे जिल्ह्याच्या राजकारणातही वाढला. 2006 मध्ये काँग्रेसकडून महापालिका निवडणूक जिंकलेल्या त्यांचे पुत्र संदीप कोतकर यांनी महापौरपद भूषवले. पुढे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही महापालिकेतील महत्त्वाची पदे सांभाळली. त्यांची सून सुवर्णा कोतकर यांनी उपमहापौरपद भूषवले. त्यामुळे केडगाव आणि कोतकर कुटुंब हे अहिल्यानगरच्या स्थानिक राजकारणातील महत्त्वाचे समीकरण बनले. भानुदास कोतकर यांच्या राजकीय प्रभावाच्या काळात पत्नी सुरेखा कोतकर यांनी जिल्हा बँकेच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळली. या माध्यमातून राजकारणाबरोबरच सहकार क्षेत्रातही कोतकर कुटुंबाचा सहभाग वाढला.

बाजार समितीच्या कामकाजात योगदान

नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून काम करताना भानुदास कोतकर यांनी चिचोंडी पाटील आणि नेप्ती येथे उपबाजार समित्यांसाठी जागा खरेदी करण्याच्या प्रक्रियेत पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली नेप्ती येथे कांदा बाजार उभा राहिला. कृषी मालाच्या व्यापारासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या या बाजारपेठेमुळे सहकार आणि कृषी क्षेत्रातील त्यांची भूमिका अधोरेखित झाली.

उद्योग समूहावर प्राप्तिकरचे छापे

राजकारणासोबतच त्यांनी हॉटेल व्यवसायातही पाऊल ठेवले. पुढे संदीप उद्योग समूहाची स्थापना झाली. या माध्यमातून कोतकर कुटुंबाचा व्यावसायिक क्षेत्रातील विस्तार झाला. अलीकडेच संदीप कोतकर उद्योग समूहाशी संबंधित व्यावसायिक आस्थापनांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे कोतकर कुटुंबाचा उद्योगसमूह पुन्हा चर्चेत आला होता.

अशोक लांडे खून प्रकरणामुळे राजकीय कारकीर्दीला धक्का

भानुदास कोतकर यांच्या राजकीय कारकीर्दीत अशोक लांडे खून प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले. या प्रकरणामुळे कोतकर पिता-पुत्रांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले. या प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाल्याने त्यांच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनावर परिणाम झाला. त्यानंतर त्यांना अहिल्यानगर जिल्ह्याबाहेर राहावे लागले. तरी देखील स्थानिक राजकारणातील सत्तासमीकरणांमध्येही कोतकर यांची भूमिका महत्त्वाची राहिली. भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अरुण जगताप यांच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. या संबंधांमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये कोतकर कुटुंबाचे स्थान चर्चेत राहिले. राजकारण, सहकार, कृषी बाजारपेठ आणि स्थानिक सत्ताकारण अशा विविध क्षेत्रांत प्रभाव निर्माण करणाऱ्या भानुदास कोतकर यांच्या निधनाने अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळातील एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT