Bhausaheb Wakchaure News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics : शिर्डीची जागा सुटणार कुणाला ? भाऊसाहेब वाकचौरे पेचात !

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : काँग्रेस पाठोपाठ आता शिवसेनेने लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडीतील तीनही पक्षात आपली बलस्थाने दाखवत मित्रपक्षांच्या अनेक जागांवर दावा केला आहे. यातून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष पेटणार की वरिष्ठ नेते यातून मार्ग काढणार याकडे लक्ष लागेल आहे. वरिष्ठांनी काढलेल्या मार्गावर स्थानिक पातळीवर मान्यता मिळणार का ? अशी मोठी प्रक्रिया असल्याने इच्छुक उमेदवारही सध्या साशंक आहेत. त्यामुळे आपली भूमिका बंद मुठीत ठेवण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत.

नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर दक्षिण या दोन्ही जागांवर काँग्रेस (Congress) पक्षाने दावा केला आहे. यातील शिर्डीची जागा शिवसेना (ठाकरे गट) तर नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडे आहे. मात्र, शिर्डीचे शिवसेनेचे (Shivsena) खासदार सदाशिव लोखंडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले आहेत. तर नगर दक्षिणेतून राष्ट्रवादीला गेली अनेक टर्म विजय मिळवता आलेला नाही. या परिस्थितीत आता ठाकरे गटाने शिर्डीतून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव पुढे आणले आहे.

भाऊसाहेब वाकचौरे यांचा राजकीय प्रवास शिवसेना, काँग्रेस, भाजप (BJP) असा राहिला आहे. शिवसेनेकडून निवडणूक लढवत 2009 ला शिर्डीतून निवडून आले. मात्र, 2014 ला काँग्रेस कडून निवडणूक लढवताना त्यांचा सदाशिव लोखंडे यांनी पराभव केला. त्यानंतर त्यांनी 2014 ला श्रीरामपूर मधून भाजप कडून विधानसभा लढवली, मात्र त्यातही ते पराभूत झाले. आता सदाशिव लोखंडे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने बदलत्या अनुकूल राजकीय परस्थितीत वाकचौरे पुन्हा ऍक्टिव्ह झाले असून त्यांचा ओढा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे.

वाकचौरे यांनी नुकतीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुंबईत भेट घेतली. शिर्डी लोकसभा चाचपणीत वाकचौरे यांचे नाव पुढे आले असून ते येत्या 23 ऑगस्टला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हातावर पुन्हा शिवबंधन बांधणार आहेत. गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीस वाकचौरे उपस्थित नव्हते. मात्र, 23 ऑगस्ट बाबत आपल्याला माहिती कळाल्याचे त्यांनी सांगितल्याने त्यांचा शिवसेना प्रवेश नक्की मानला जात आहे. दरम्यान, शिवसेना, काँग्रेस, भाजप पक्ष फिरून आलेले वाकचौरे शिर्डीची जागा शिवसेनेकडेच राहणार की काँग्रेस खेचून घेणार या साठी वेट अँड वॉचमधे असल्याचेही बोलले जाते.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT