BHR Society Sunil Zawar
BHR Society Sunil Zawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

बीएचआर घोटाळा : पुण्याच्या डेक्कन रोडनंतर शिक्रापूर गुन्ह्यातही सुनील झंवरला झटका

Sampat Devgire

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील (Bhaichand Hirachand society scam) अपहाराच्या प्रकरणात शिक्रापूर (जि. पुणे) गुन्ह्यात मुख्य संशयित सुनील झंवरचा (Main Accuse Sunil Zawar) अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. यापूर्वी डेक्कनच्या गुन्ह्यात देखील त्याचा जामीन फेटाळल्याने झंवरचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

बीएचआर अपहार प्रकरणात शिक्रापूर (पुणे) येथील गुन्ह्यात दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर मुख्य संशयित सुनील झंवरचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला. दहा दिवसांपूर्वीच (ता. २० ऑक्टोबर) डेक्कनच्या गुन्ह्यात झंवरचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून, शिक्रापूरच्याही गुन्ह्यात जामीन नाकारल्याचे विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांनी सांगितले.

शिक्रापूरची फिर्याद

लोहगाव (ता. पुणे) संतोष काशीनाथ कांबळे (वय ५७) यांचे वडील शिक्षक काशीनाथ भगवान कांबळे १९९० मध्ये निवृत्त झाले. बीएचआर पतसंस्थेच्या आकर्षक व्याजदराची जाहिरात वाचून काशीनाथ कांबळे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी या नावाने भीमा कोरेगाव आणि शिक्रापूर शाखेत निवृत्तीचा संपूर्ण पैसा २०१४ मध्ये गुंतवणूक केला होता. ठेवींच्या बदल्यात दोन्ही शाखांनी मिळून १८ लाख सात हजार १५९ रुपये त्यांना देय होते. परंतु मुदत संपल्यानंतरही पैसे परत मिळाले नाहीत.

श्री. कांबळे यांनी २०१५ मध्ये दोन्ही शाखांमध्ये संपर्क केल्यावर त्या बंद पडल्याची माहिती त्यांना मिळाली. परिणामी त्यांनी मुख्य शाखा जळगाव (एमआयडीसी) गाठले. येथे अवसायक जितेंद्र कंडारे याने पतसंस्था बुडाल्याचे सांगत १५ ते २० टक्के रक्कम परतावा देण्याचे सांगितले. तसेच बाकीची रक्कम बुडणार असून आमचे लोक तुमच्या घरी येतील, त्यांना १०० रुपयांच्या स्टॅम्पवर ते म्हणतील तसे लिहून देत सह्या करा, असे म्हणत कंडारेकडून हकलून लावण्यात आले. २० टक्क्यांवर मॅचिंगसाठी कंडारेने नेमलेले दोन दलाल कांबळेंच्या घरी पाठवण्यात आले होते.

निधनानंतरही पैसा दिला नाही

वडिलांचा मृत्यू झाल्यावर मुलगा संतोष कांबळे याने फेब्रुवारी २०२० मध्ये परत एकदा जळगाव गाठले. वडिलांचा मृत्यू झाला आता तरी, पैसे द्यावे. अशी विनवणी केल्यावर कंडारेने, उलट जे मिळताय (३० टक्के) ते घ्या आता मोठा कर्जदार तुम्हाला पैसे देण्यास तयार आहे. नंतर, तेही मिळणार नाही असे धमकावले. अखेर कांबळे यांनी २५ नोव्हेंबर २०२० ला शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT