Bhupesh Baghel, C.M., Chhatisgarh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांना पुण्यात महात्मा फुले समता पुरस्कार!

समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळयांनी ही माहिती दिली.

Sampat Devgire

नाशिक : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीदिनी रविवारी सकाळी दहाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांना यंदाचा ‘समता पुरस्कार' प्रदान करण्यात येईल. एक लाख रुपये, फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुण्यातील समता भूमी महात्मा फुले स्मारकामध्ये समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होईल.

समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, पुणे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, वैष्णवी सातव यांनी ही माहिती दिली. श्री. भुजबळ म्हणाले, की महात्मा फुले समता पुरस्कार सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता अशा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना प्रदान करण्यात येत असतो. यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, विरप्पा मोईली, खासदार शरद यादव, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, ज्येष्ठ लेखक डॉ.भालचंद्र नेमाडे, डॉ. बी. एल. मुणगेकर, लेखिका अरुंधती रॉय, प्रा. डॉ. मा. गो. माळी, ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. तात्याराव लहाने, प्रा.हरी नरके आदींना समता पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

भूपेश बघेल यांच्याविषयी

श्री. बघेल यांनी आपल्या कार्यकाळात समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ओबीसींची स्वतंत्र जनगणना सुरु करणारे देशातील छत्तीसगड हे प्रथम राज्य असून त्याची यशस्वी अंमलबजावणी श्री. बघेल यांच्याकडून केली जात आहे. त्यांनी राजकीय कार्यासोबत आपल्या कार्यातून महात्मा फुले यांचा सामाजिक वारसा विकसित केला. त्यांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे, असे श्री. भुजबळ यांनी सांगितले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT