Jalgaon Bhusawal Politics News : प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत भुसावळ नगरपालिकेच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी देखील शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. गेल्या चार- पाच महिन्यांपासून भुसावळचे राजकारण थंड झाल्याचे वाटत होते. मात्र, या प्रवेशामुळे भुसावळसह जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ झाली आहे.
मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. अनिल चौधरी हे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे बंधू आहेत. मध्यंतरी अनिल चौधरी यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करून प्रचारही सुरू केला होता. त्यामुळे महायुतीतील भाजपचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या मार्गात अडसर निर्माण झाला होता.
मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केल्यानंतर चौधरी यांनी उमेदवारी मागे घेतली होती. त्यातून नंदकिशोर महाजन यांचा मार्ग अधिक सोपा झाला. त्याचवेळी चौधरी पुढे जाऊन शिवसेनेत प्रवेश करतील असे बोलले गेले होते.
दरम्यान, नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गायत्री भंगाळे निवडून आल्या होत्या. भंगाळे यांनी भाजपच्या उमेदवार व वस्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा धक्कादायक पराभव केला होता.
मात्र, बहुमत भाजप महायुतीकडे होते. दरम्यान, जात पडताळणी समितीने भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्याने त्यांना पदावरून दूर व्हावे लागले. सध्या भाजपच्या उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे प्रभारी नगराध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. असे असताना आता गायत्री भंगाळे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकत एकनाथ शिंदेंचा धनुष्यबाण हाती घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.
भुसावळ हा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा मतदारसंघ आहे. मंत्री सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव पत्कराला लागला, तो त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. अशा परिस्थितीत अनिल चौधरी यांच्यासह गायत्री भंगाळे यांचा शिंदे सेनेतील प्रवेश भुसावळच्या राजकारणाला आणखी कलाटणी देणारा ठरू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.