Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात एका तरुणाला नग्न करून हात-पाय बांधून अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ देखील संशयित आरोपींनी सोशल मीडियावर व्हायरल केला. स्वातंत्र्यदिनी पीडित तरुणाच्या आईने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे न्यायाची मागणी केली.
संशयितांनी पीडित तरुणाला नग्न करून त्याला उठाबशा काढायला लावल्या, तसेच लाथा बुक्क्यांनी व बेल्टने मारहाण केली. ही घटना एप्रिल महिन्यातच घडलेली आहे. मात्र अद्याप इतकी गंभीर घटना असूनही या घटनेची दखल कुणी घेतली नसल्याची तक्रार पीडित तरुणाच्या आईने केली. पीडित तरुणाच्या आईने आपल्या मुलाला न्याय मिळावा यासाठी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवले. मात्र त्यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी थेट पालकमंत्र्यांकडे धाव घेतली.
पीडित तरुणाच्या आईने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभू्मीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत त्यांच्यापुढे न्यायासाठी टाहो फोडला. या प्रकरणात दोषींवर अद्याप कठोर कारवाई न झाल्याचा आरोप करत पीडित तरुणाच्या आईने आपली व्यथा मांडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ महिन्यांपूर्वी एप्रिल महिन्यातच ही घटना घडली. पीडित तरुणाला काही तरुणांनी विवस्त्र करून अत्यंत निर्दयीपणे मारहाण केली होती. मारहाणीचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल देखील करण्यात आला होता. मात्र, या घटनेला ४ महिने उलटूनही दोषींवर कडक कारवाई झाली नसल्याचे सांगत पीडित तरुणाच्या आईने पालकमंत्र्यांकडे न्यायाची याचना केली.
यावेळी, पीडित तरुणाच्या आईने आपल्या मुलाला झालेल्या मारहाणीचे व्हायरल व्हिडिओ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दाखवले. हे व्हिडीओ दाखवताना आईला अश्रू अनावर झाले होते. या घटनेनंतर माझा मुलगा बरेच दिवस बोलत नव्हता. त्याच्यासोबत जो प्रकार घडला, ते पाहून आम्हाला समाजात सन्मानाने वागता येत नव्हतं. घरातच जीवन संपवण्याचे विचार येत होते असं पीडित तरुणाच्या आईने सांगितलं.
मात्र, जे माझ्या मुलासोबत घडलं ते कुणासोबत घडू नये यासाठी मी आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी लढा देत आहे. आरोपींना देखील जोपर्यंत अशी शिक्षा दिली जात नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. त्यांनाही विवस्त्र करून शिक्षा द्यावी. तोपर्यंत त्यांना या घटनेचं गांभीर्य लक्षात येणार नाही. नाहीतर त्यांची हिंमत वाढेल, त्यांनी जे माझ्या मुलासोबत केलं, तेच ते उद्या माझ्यासोबत किंवा माझ्या पतीसोबत करू शकतात, अशी भिती पीडित तरुणाच्या आईने व्यक्त करत कारवाईची मागणी केली.
दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने कठोर पावले उचलली आहेत. त्यांनी जळगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ व कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.