Fadnavis Thorat Fugdi at Sarla Bet : सरला बेट येथे सुरू असलेल्या श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनानिमित्त आयोजित सोहळ्यात राजकीय आणि आध्यात्मिक वातावरणाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. संतांच्या व्यासपीठावर हरिनामाच्या जयघोषात भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एकत्र फुगडी खेळल्याने उपस्थितांचे लक्ष वेधले.
विशेष म्हणजे, भाजप (BJP) आमदार विवेक कोल्हे यांनी पुढाकार घेत थोरात यांना फडणवीस यांच्या दिशेने नेत फुगडीचा आग्रह धरला. त्यामुळे फडणवीस आणि थोरात यांच्यात रंगलेली फुगडी हा सोहळ्यातील चर्चेचा प्रमुख क्षण ठरला. संतांच्या व्यासपीठावर भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांची रंगलेली फुगडी हा सोहळ्यातील लक्षवेधी क्षण ठरला.
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार विठ्ठल लंघे, आमदार अमोल खताळ, आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, महंत रामगिरी महाराज आणि माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
काल्याच्या कीर्तनानंतर व्यासपीठावर हरिनामाचा गजर सुरू झाला. वारकरी परंपरेनुसार फुगडीचा खेळ सुरू झाल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस आणि रामगिरी महाराज यांच्यात फुगडी रंगली. त्यानंतर पालकमंत्री विखे पाटील आणि फडणवीस यांनीही फुगडी खेळली. दरम्यान, रामगिरी महाराज आणि बाळासाहेब थोरात फुगडी खेळत असताना त्यांच्या मागे फडणवीस आणि आमदार अमोल खताळ यांचीही फुगडी सुरू होती. त्यानंतर विखे पाटील आणि रामगिरी महाराज यांच्यात फुगडी रंगली.
याच वेळी आमदार विवेक कोल्हे यांनी पुढाकार घेत बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिशेने नेले आणि दोघांनी फुगडी खेळावी, असा आग्रह धरला. त्यानंतर काही क्षणांतच फडणवीस आणि थोरात आमने-सामने आले आणि दोघांनीही फुगडीचा आनंद घेतला.
भाजप आणि काँग्रेस हे महाराष्ट्रातील दोन वेगळ्या राजकीय विचारधारांचे पक्ष आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांपैकी फडणवीस आणि थोरात यांनी संतांच्या व्यासपीठावर एकत्र फुगडी खेळल्याने राजकीय चर्चांना उधाण येणे स्वाभाविक मानले जात आहे. विशेषतः यामागे आगामी जिल्हा सहकारी बँक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय संदर्भ आहेत का? याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
फडणवीस आणि थोरात यांची फुगडी संपत नाही तोच, रामगिरी महाराज यांनी पुढाकार घेत दोघांचे हात पकडले आणि त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सहभागी करून घेतले. त्यानंतर चौघांनीही हरिनामाच्या जयघोषात फुगडीचा आनंद घेतला. एकनाथ शिंदेंचा शिलेदार आमदार अमोल खताळ आणि थोरात यांच्यात संगमनेरमधील राजकीय स्पर्धेला यानिमित्ताने उजळणी मिळाली. व्यासपीठावर राजकीय नेते फुगडी खेळत असताना मैदानात उपस्थित महिला आणि पुरुष भाविकांनीही आपापसात फुगडी खेळत वारकरी परंपरेचा आनंद घेतला. त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.