Balasaheb Sanap Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Sanap : "मी शिवसेनेशी कोणताही संपर्क केला नाही, पण...", फडणवीसांचा उल्लेख करत सानपांचं विधान

Arvind Jadhav

Nashik News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोदाआरतीला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. निधी उपलब्ध असून, या आठवड्यात प्रत्यक्षात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरू होईल. मात्र, तत्पूर्वी माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी गोदाआरतीचे नियोजनच चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे सांगत त्याविरोधात रान पेटवण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने ( ठाकरे गट ) सानप यांच्या या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. ( Ex Mla Sanap denies joining Thackeray Group )

नाशिक पूर्वचे भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप मागील अनेक काही वर्षांपासून पक्षात अज्ञातवासातच आहे. मात्र, रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि पुरोहित संघ यांच्या वादात ते पुरोहित संघाच्या बाजुने मैदानात उतरलेत. तर, रामतीर्थ गोदावरी सेवा समिती ही शासनाने गठीत केलेली समिती आहे. गोदाआरतीचा मान पुरोहित संघाकडेच असावा, अशी सानप यांची मागणी आहे. तर प्रशासनाच्या समितीत तीन आमदार, प्रशासकीय अधिकारी आणि काही स्थानिक नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन्ही समितीतील वाद तसा स्थानिक पातळीवर मिटवण्यासारखाच होता. मात्र, भाजपकडूनही काही प्रमाणात हवा देण्यात आली. गोदाआरतीसाठी नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे सुरूवातीपासून आग्रही होत्या. त्यांनीच पाठपुरावा करून यासाठी निधी मिळवला. एवढेच नव्हे तर प्रत्यक्षात गोदाआरती कसे असेल याचे प्रारूप ठरवण्यातही आघाडी घेतली. रामकुंड परिसर भाजपचे पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या मतदार संघात येतो. भाजपच्या कुरघोडीच्या राजकारणाची मेख नेमकी येथेच दडली आहे. आता सुरू झालेला वाद निस्तारण्याची जबाबदारी आमदार ढिकले यांच्यावर आहे. तर, निधी मिळवून दिल्याचे श्रेय फरांदे यांच्याकडे जाणार आहे. समिती आणि संघातील वाद वाढला तर निधी परत जाण्याची सुद्धा भिती आहे.

नाशिक पूर्व मतदारसंघाचे यापूर्वी प्रतिनिधित्व केलेल्या बाळासाहेब सानप (BalaSaheb Sanap) यांना आता आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. यासाठी त्यांची तयारी सुद्धा सुरू झाली आहे. मात्र, भाजपकडून (BJP) तिकीट मिळेल याची शाश्वती नाही. ही संधी हुकली तर आगामी निवडणुकांपर्यंत सानपाच्या वयाचा आणि आरोग्याचाही प्रश्न उभा राहिल. त्यामुळे काहीही करून यंदाची निवडणुक लढवयाचीच, असा चंग सानप यांनी बांधल्याची चर्चा आहे. भाजपमध्ये असताना सुद्धा त्यांनी पुरोहित संघाच्या माध्यमातून उभा केलेला विरोध त्याचीच नांदी म्हणावी लागेल. दोन दिवसांपूर्वी पुरोहित संघाच्या समर्थनासाठी ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनात सानप यांचा मोठा वाटा होता. या बैठकीला विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत साधू महंत आणि विविध आखाड्याचे प्रमुख हजर राहिले होते.  

तुर्तास, या वादावर बोलताना सानप म्हणाले की, "माझा विरोध पक्षाच्या निर्णयाला नाही. पुरोहित संघाचा अधिकार त्यांना मिळवून देण्याचे काम मी करतो आहे. माझ्याविरोधात काही तक्रारी गेल्या असतील तर मला कल्पना नाही. मी भाजपमध्येच आहे. मी शिवसेनेशी (Shiv sena) कोणताही संपर्क केलेला नाही. पण, विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस जो आदेश देतील तो मला मान्य आहे," असे सांगत सानपांनी चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात मारला. गोदाआरतीमुळे सुरू झालेल्या गोंधळातून आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikle) कसा मार्ग काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT