Nagar News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नगर दौऱ्यावर असताना तेथील संपर्कनेते बबनराव घोलप अनुपस्थित होते. ठाकरे नगरला तर घोलप मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला मुंबईत अशी स्थिती दिसून आली.दरम्यान घोलप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले शिंदे गटात प्रवेश करण्याचे अद्याप निश्चित केलेले नाही. मात्र मी शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक - दोन दिवसांमध्ये याबाबत कार्यवाही करेन, असे 'सरकारनामा'ला सांगितले.
बबनराव घोलप शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत होते. मात्र माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर बबनराव घोलप नाराज होते. याबाबतची नाराजी त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे देखील बोलून दाखविली होती. वरिष्ठ नेत्यांनी याबाबत लवकरच चर्चेतून तोडगा काढू असे संकेत दिले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नगरच्या दौऱ्यावर असताना त्याचवेळी घोलप हे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. सह्याद्री विश्रामगृहावर 12 फेब्रुवारीला झालेल्या या बैठकीत चर्मकार महामंडळ आणि चर्मकार समाजाच्या विविध मागण्याबाबत चर्चा करण्यात आली. वीस सदस्यांच्या या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत विविध मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईत गोवंडी येथे संत रोहिदास चर्मकार प्रशिक्षण व लघुउद्योग केंद्राची निर्मिती करण्याचे ठरले.
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातील रिक्त पदे भरून महामंडळाला पुरेसा निधी उपलब्ध करण्याबाबत चर्चा झाली. या महामंडळाचे अध्यक्षपदी घोलप अथवा त्यांचे चिरंजीव यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.
या सर्व बैठकीची माहिती एकनाथ शिंदे गटाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांनी सोशल मीडियावर टाकली आहे. घोलप लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, असे संकेत या सर्व घडामोडींतून मिळत आहेत. त्यामुळे लवकरच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.