Ram Shinde Radhakrishna Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ram Shinde Radhakrishna Vikhe : राम शिंदे नाराज? विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं; जिल्हा बँक निवडणुकीवर पुष्कळ खलबतं...

Radhakrishna Vikhe Patil breaks silence on Ram Shinde alleged displeasure : संगमनेरच्या सर्वपक्षीय बैठकीवरून राम शिंदेंनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला होता; आता विखे पाटलांनी शिंदे नाराज नसल्याचे स्पष्ट केले.

Pradeep Pendhare

Ahilyanagar District Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या भूमिकेची चर्चा सुरू झाली होती.

संगमनेर येथे जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीवरून शिंदे यांनी महायुतीचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला होता. आता विखे पाटील यांनी राम शिंदे नाराज असल्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण दिले आहे.

राम शिंदे यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. ते कुठेही नाराज नाहीत, असे राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होऊ द्यावी. अर्ज भरणे, छाननी यासह पुढील प्रक्रिया झाल्यानंतर चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

विखे पाटील म्हणाले, “बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया होऊ दिली पाहिजे. त्यानंतर पुष्कळ दिवस खलबतं करण्यासाठी वेळ आहे. सहकारी संस्थेत राजकारण नको, हे आम्हीच भाषणांमधून सांगतो. त्यामुळे राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून जिल्हा बँकेची निवडणूक व्हावी, अशीच आमची भूमिका आहे.”

राम शिंदे यांच्याशी जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकत्र बसून चर्चा केली जाईल, असेही विखे पाटील यांनी सांगितले. सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असून अर्ज भरण्यानंतर छाननी आणि इतर टप्पे बाकी आहेत. त्यामुळे अंतिम निर्णयाबाबत घाई करण्याची गरज नसल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संगमनेर येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीची आपल्याला माहिती नव्हती, असा दावा विखे पाटील यांनी पुन्हा केला.

राम शिंदे यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

संगमनेर येथील सर्वपक्षीय बैठकीनंतर राम शिंदे यांनी पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बैठकीबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि बँकेच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. पालकमंत्री म्हणून विखे पाटील यांनी भूमिका स्पष्ट करावी. नाहीतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसाठी सभापती म्हणून मला भूमिका घ्यावी लागते की काय? असा सवाल राम शिंदे यांनी केला होता. त्यामुळे शिंदे आणि विखे पाटील यांच्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून मतभेद आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.

जामखेडच्या बैठकीत दोघे एकाच व्यासपीठावर

दरम्यान, जामखेड तालुक्यातील दुष्काळी आढावा बैठक नुकतीच झाली. या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे एकाच व्यासपीठावर शेजारी बसले होते. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, राम शिंदे नाराज असल्याची चर्चा विखे पाटील यांनी फेटाळून लावली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ द्यावी आणि त्यानंतर सर्व संबंधित नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील अर्ज प्रक्रिया, छाननी आणि त्यानंतर महायुतीतील नेत्यांमध्ये होणारी चर्चा याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT