Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan : मोठी बातमी, गिरीश महाजनांनी घेतली श्रीरामपूर जिल्हा करण्याची जबाबदारी; मुख्यमंत्र्यांसमोर प्रस्ताव मांडणार

Pradeep Pendhare

Ahmednagar News : श्रीरामपूर जिल्हा करायचा, जिल्हा करायचा, या काही पारावरच्या गप्पा नाहीत, अशा शब्दात भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी भर कार्यक्रमात फटकारले होते. मात्र दोनच दिवस होत नाही तोच, भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी श्रीरामपूरमध्ये येत श्रीरामपूर जिल्हा करण्याची जबाबदारी घेत, तसा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर प्रस्ताव मांडणार असल्याचे जाहीर केले.

गिरीश महाजन यांनी ही घोषणा श्रीरामपुरमध्ये येऊन केली. विशेष म्हणजे, गिरीश महाजन यांनी ही भूमिका श्रीरामपूरमधील भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमात जाहीर केली. त्यामुळे एकाच पक्षातील दोन नेत्यांनी एकाच विषयावर वेगवेगळी भूमिका मांडल्याने, आता राजकीय कुवतीची चर्चा श्रीरामपूमध्ये रंगली आहे. 

भाजप (BJP) ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मंत्री गिरीश महाजन बोलत होते. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केलेल्या मागणीचा उल्लेख करत महाजन म्हणाले, "जिल्ह्यात विखे पाटील यांच्यासारखे मातब्बर मंत्री आहेत. तरी काही मागण्या माझ्याही कानावर येऊ द्या. भौगोलिक दृष्टिकोनातून अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन ही काळाची गरज आहे. श्रीरामपूरच्या बाबतीत मी नेहमी हजर राहील. श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीला न्याय देण्याचा प्रयत्न करीन". 

यावेळी माजी खासदार लोखंडे यांनी पाण्यासंदर्भात 2005 चा काळा कायदा मागे घेण्याची मागणी केली. त्याचबरोबर मुळा प्रवरा वीज संस्थेचे पुनरुज्जीवन करून याच संस्थेमार्फत सौर ऊर्जा योजना लाभक्षेत्रात राबविण्याची मागणी केली असून त्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे मंत्री महाजनांनी सांगितले. 

गिरीश महाजन यांनी बदलत्या राजकारणावर टिप्पणी केली. "राजकारण बदलत चालले आहे. इच्छा नसताना काही तडजोडी कराव्या लागल्या. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हिंदुत्व सोडून मुख्यमंत्री पदासाठी दुसऱ्यासोबत गेले. आपल्याकडेही काही बाहेरचे सोबती आले. त्यांना सामावून घेताना मूळ कार्यकर्त्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे. पण भारतीय जनता पक्षांमध्ये कुणावरही अन्याय होणार नाही". मोदी पंतप्रधान असणे ही देशाची गरज आहे. शेजारील बांगलादेशात हिंदू वर होणारा अन्याय पाहवत नाही. आपण जाती-जातीत भांडणे सोडून एक होणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

माजी खासदार सदाशिव लोखंडे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. सांगलीचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, चंद्रशेखर कदम, भाऊसाहेब कांबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, प्रशांत लोखंडे, देवळालीचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यावेळी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT