Chandrakant Raghuwanshi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

हा शहाणपणा भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेत तरी आहे का!

शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबारच्या भाजपच्या नेत्यांची खरडपट्टी काढली.

Sampat Devgire

नंदुरबार : महापालिका (Nandurbar) आर्थिक अडचणीत आहे. अशा स्थितीत करमाफीची मागणी करणे हा भाजप (BJP) नेत्यांचा अजब शहाणपणा आहे. करमाफी देणारी संस्था त्यांनी दाखवून द्यावी. मी स्वतः तेथे भेट देईल. भाजपचे नेते खोटारडे व दिशाभूल करण्यासाठी पत्रकबाजी करतात, अशा शब्दात शिवसेना (Shivsena) नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला.

शहरात सध्या महापालिकेतर्फे करवसुलीसाठी मोहीम सुरु आहे. त्यासाठी काही ठिकाणी जप्तीची कारवाई देखील केली जात आहे. त्याला भाजपने विरोध केला आहे. महापालिकेने जप्तीची कारवाई करू नये, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केली आहे. त्याचा श्री. रघुवंशी यांनी चांगलाच समाचार घेतला.

याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी म्हणाले, कोरोनामुळे दोन वर्षांत अनेक व्यवसाय डबघाईस आले. अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अशा स्थितीत नंदुरबार पालिकेने सक्तीच्या वसुलीचे आदेश देणे अन्यायकारक आहे. सक्तीची वसुली कराल तर तोंडघशी पडाल. यावेळी भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी, पालिकेचे विरोधी पक्षनेते ॲड. चारूदत्त कळवणकर, नगरसेवक आनंद माळी, लक्ष्मण माळी, संतोष वसईकर आदी उपस्थित होते.

श्री. चौधरी म्हणाले, की २६ फेब्रुवारीला करवसुलीसंदर्भात प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी बैठक घेतली. तीत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना निमंत्रित केले. त्यांनी सभेत करवसुलीचे आदेश दिले. श्री. रघुवंशी यांना बैठकीस येण्याचा व कर्मचाऱ्यांना धमकविण्याचा अधिकार नाही. मुख्याधिकाऱ्यांनी श्री. रघुवंशी यांना बोलावनू घटनाबाह्य काम केले. अधिकाराचा गैरवापर केला. रघुवंशी यांना राजकीय ताकद दिली. त्यामुळे श्री. थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी. विकासाला पैसा लागतो. ते आम्हाला मान्य आहे. विकासकामांत आम्हाला राजकारण करायचे नाही. त्यासाठी शासनाकडून पैसे आणावेत. त्यासाठी आम्ही सोबत आहोत. पालिकेन ५ मार्च २०१८ व १६ आक्टोबर २०२० च्या ठराव करून धनधांडग्यांना, शिक्षण संस्थांना व गाळेधारकांना सहा कोटींची घरपट्टी माफ केली. त्यांना माफ करू शकतात, तर जनतेला का नाही? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाचशे स्केवर फुटाच्या आत असलेल्या घरांना कर माफ केला. ते तुमच्याच पक्षाचे आहेत. त्यांचा आदर्श घ्यावा.

उद्यानांच्या नावावर लाखोंचा खर्च केला. मात्र, एक फुलही उद्यानात नाही. भूमिगत गटारींचा कोटींचा खर्च करूनही पाणी तुंबते. स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. २००१६-१७ या वर्षात १२ कोटी ६८ लाख ६६ हजार ४९५ रुपये करवसुली दाखविली आहे. ताळेबंदमध्ये मात्र सात कोटी ७१ लाख ७१ हजार ४२२ रुपये वसुली दाखवितात. इतर रक्कम घशात व खिशात टाकल्याचा आरोपही श्री. चौधरी यांनी केला.

सुरवात स्वतःपासून करा : माजी आमदार

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश द्यावा, असे म्हटले आहे. यापूर्वी न्यायालयाने आदेश दिला आहे. (कै.) डॉ. कमलताई मराठे यांनी तक्रार केलेले सर्व अतिक्रमण काढा. त्यानंतर शहरातील प्रत्येक अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत राहू, असे आव्हान माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दिले.

मी त्यांचा नेता आहे...

याबाबत श्री. रघुवंशी म्हणाले, महाराष्ट्रातील नगरपरिषद अथवा महापालिकेने अशा पद्धतीने घर आणि पाणीपट्टी माफी दिली असेल, तर आपण त्याचे नाव आम्हाला कळवावे. अशी एकही नगरपरिषद अथवा महापालिका असेल, तर आपण दोघेही त्या शहराला भेट देऊ. त्यांनी दिलेल्या घर आणि पाणीपट्टी माफीचा अभ्यास करून ती योजना कार्यन्वित करण्याचा प्रयत्न करू, अन्यथा खोटी पत्रकबाजी करून नंदुरबारकरांची दिशाभूल थांबवावी, असे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटले आहे. राहिला विषय सभेत बोलण्याचा, तर पालिकेचा करवसुलीचा आढावा बैठकीत नगराध्यक्षांनी मला आमंत्रित केले होते. मी त्यांचा नेता आहे. त्या नात्याने बैठकीला गेलो. त्यामुळे त्यात घटनाबाह्य कामाचा प्रश्‍नच येत नाही, असे श्री. रघुवंशी यांनी स्पष्ट केले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT