Shivsena workers in clean nashik drive
Shivsena workers in clean nashik drive Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये शिवसेने पाठोपाठ भाजपच्या हाती झाडू!

Sampat Devgire

नाशिक : केंद्र सरकारच्या (Centre Government) स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत नाशिकला (Nashik) वरच्या क्रमांकावर पोचविण्यासाठी शिवसेनेने (Shivsena) हाती झाडू घेत शहरात स्वच्छता मोहीम राबविली. त्यानंतर भाजपनेही स्वच्छता मोहिमेत उडी घेत हाती झाडू घेतला आहे. त्यामुळे राज्यात धार्मिक राजकारण रंगात आले असले तरी नाशिकमध्ये मात्र भाजप- (BJP) शिवसेनेत स्वच्छतेचे राजकारण आगामी निवडणुकीतील प्रमुख विरोधी भाजप व शिवसेनेत सुरू झाल्याने स्पर्धेतून का होईना, नाशिककरांकडूनदेखील या भूमिकेचे स्वागत होत आहे.

केंद्र सरकारकडून देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. अभियानाच्या सातव्या वर्षात नाशिक शहराला पहिल्या दहामध्ये आणण्यासाठी सर्वच जण सरसावले आहे. महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी विविध पातळ्यांवर जनजागृतीची मोहीम राबवून स्वच्छतेचा जागर केला आहे, तर दुसरीकडे सामाजिक, सांस्कृतिक, वकील, डॉक्टर, कलाकार, शालेय विद्यार्थीदेखील या मोहिमेत उतरले आहे.

स्वच्छता मोहिमेंतंर्गत जानेवारी महिन्यात देशपातळीवर स्पर्धा होते. केंद्राचे पथक पाहणी करून गुणांकन जाहीर करते. कोरोनामुळे या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणाला विलंब झाला. केंद्र सरकारचे पथक नुकतेच नाशिकला येऊन गेले. खतकचरा प्रकल्प, जैविक कचरा प्रकल्प, वेस्ट टू एनर्जी, मलनिस्सारण प्रकल्प, गोदाघाटासह प्रकल्पांची पाहणी करून आढावा घेतला. २०२० मध्ये स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिकचा ११ वा क्रमांक होता. २०२१ मध्ये सतराव्या क्रमांकावर घसरण झाली. त्यामुळे यंदा कुठल्याही परिस्थितीत पहिल्या दहा शहरांमध्ये नाव येण्यासाठी नाशिककर सरसावले आहे. फीडबॅक फॉर्मच्या माध्यमातून नाशिककरांना दोन दिवस संधी आहे.

स्वच्छता मोहीम

शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शहरात बुधवारपासून स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. राजकीय पक्षाचा पाठिंबा असल्याशिवाय कुठलीही मोहीम यशस्वी होत नाही, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. शिवसेनेच्या या भूमिकेने शहरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून फीडबॅक फॉर्म भरून घेतले जात आहे. तीस हजारांहून अधिक फॉर्म या मोहिमेतून भरले गेले आहेत. राज्यात धार्मिक तेढ निर्माण होईल असे वातावरण असताना शिवसेनेच्या स्वच्छता मोहिमे पाठोपाठ भाजपनेही हातात झाडू घेत शहरभर स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. शहरातील दहा मंडलात प्रत्येक प्रभागामध्ये साप्ताहिक स्वच्छता अभियान राबविले जात असल्याचे भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी सांगितले.

स्वच्छतेत पहिल्या दहाच्या यादीत नाशिक आलेच पाहिजे ही आमची भूमिका आहे. स्वच्छतेतून तीस हजारांच्या वर फीडबॅक फॉर्म भरून घेतले जाणार आहे. ८० टक्के समाजकारणाचा वारसा शिवसेनेने सोडलेला नाही.

- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना.

-----

केंद्र सरकारच्या स्वच्छता मोहिमेत वरचा क्रमांक मिळविण्यासाठी भाजपचे पदाधिकारी स्वच्छता मोहिमेत उतरले आहेत. त्याचबरोबर नाशिककरांमध्ये जनजागृती करून नाशिककरांना मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे.

- गिरीश पालवे, शहराध्यक्ष, भाजप.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT