BJP MLA Dilip Borase
BJP MLA Dilip Borase Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजप आमदार बोरसे म्हणाले, विकासाच्या आड येणाऱ्यांना ठेचून काढा!

Sampat Devgire

सटाणा : दीनदलितांच्या विकासासाठी मी १८ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करून आणला होता. मात्र, तालुक्याच्या विकासाऐवजी स्वतःच्या विकासाला महत्व देणाऱ्या अशा स्वयंघोषित नेत्यांनी हा भरीव निधी रद्द करण्याचे पाप केले. विकासाच्या आड येणाऱ्या अशा प्रवृतींना जनतेने वेळीच ठेचून काढावे, असे प्रतिपादन बागलाणचे आमदार दिलीप बोरसे (Dilip Borse) यांनी केले.

बागलाण तालुक्यातील ठेंगोडा जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण शुक्रवारी आमदार बोरसे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुळाणे येथून लोकार्पण सोहळ्याला प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रामचंद्रबापू पाटील होते.

आमदार बोरसे म्हणाले, राजकारण करत असताना पक्षविरहित मैत्री टिकविण्याचे काम केले आहे. या व्यक्तिगत संबंधामुळे आपल्या तालुक्याचा कायापालट करण्यासाठी मला मदत होत असताना काही प्रवृत्ती आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी विकासकामांना खीळ घालण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली. आपण प्रत्येक गाव विकासाचे केंद्र बिंदू मानून विकासाची घोडदौड सुरु आहे. दळणवळण सुलभ करण्यासाठी पूल व रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी दोन वर्षात सव्वाशे कोटीपेक्षा अधिक निधी मंजूर झाला आहे.

ते पुढे म्हणाले, शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने आपला प्रामाणिक प्रयत्न सुरु असून, पहिल्या टप्प्यात मोसम व आरम, कान्हेरी या नद्यांवरील ब्रिटीशकालीन बंधारे दुरुस्तीबरोबरच केटीवेअर बंधारे प्रस्तावित करण्यात आले आहेत. गोळवाड येथील मोरदर बंधारा दुरुस्तीसाठी ३१ लाख व मोसम नदीवरील तांदुळवाडी येथील ब्रिटीशकालीन बंधाऱ्यासाठी ६० लाख रुपये मंजूर झाले आहेत. तर ठिकठिकाणच्या २३ बंधारे दुरुस्तीसाठी निधी मंजूर असून, सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आल्याचे स्पष्ट करत प्रलंबित डाव्या कालव्याच्या कामासाठी ४१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तळवाडे भामेर पोहच कालव्याच्या आरसीसी कामासाठी ७७ लाख आणि लाभक्षेत्रातील शेत शिवाराच्या रस्त्यांसाठी आणि लहान पुलांच्या कामासाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही आमदार बोरसे यांनी दिली.

याप्रसंगी ठेंगोडा जिल्हा परिषद गटाच्या सदस्या मीना मोरे, पंचायत समिती सभापती इंदुबाई ढूमसे, उपसभापती ज्योती अहिरे, पंचायत समिती सदस्य माणिक अहिरे, सटाणा बाजार समिती सभापती पंकज ठाकरे, सुरेश जाधव, लक्ष्मण मांडवडे, आण्णा पगारे, किशोर कोठावदे, भरत अहिरे, मनोज अहिरे, कैलास सावकार, नाना सूर्यवंशी, आबा इंगळे, नितीन वाघ, मनीषा अहिरे, डॉ. गोकुळ अहिरे, रुपाली पंडित, माधवराव अहिरे, साखरचंद बच्छाव, आबा पवार, कडू अहिरे, रमेश अहिरे आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT