Ahilyanagar News : निवडणूक आयोगाच्या विधानसभा निवडणुकीला राबवलेल्या यंत्रणेवर अविश्वास व्यक्त करत बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरे देखील त्यांची भेट घेत आहे. राज्यातील 26 जणांनी फेरमोजणीची मागणी केली असतानाच, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यामधले भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी निवडणूक आयोगाने राबवलेल्या यंत्रणेचे कौतुक केले आहे.
"निवडणूक आयोगाची यंत्रणेत दोष किंवा शंका आढळल्यास आमदारकीचा राजीनामा देईल अन् पुन्हा निवडणुकीला समोरे जाईल. असा करणारा राज्यातील पहिला आमदार असेल", असे विक्रम पाचपुते यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीला महायुतीला राज्यात 237 जागांवर यश मिळाले. महाविकास आघाडीचा या निवडणुकीत पुरता धुव्वा उडाला. महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी राबवलेल्या यंत्रणेला दोष दिला. ईव्हीएम हॅक झाल्याच्या तक्रारी झाल्या. शरद पवार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे, नाना पटोले आदी प्रमुख नेत्यांनी ईव्हीएमवर खापर फोडले. निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. समाजसेवक बाबा आढावा यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा वाढू लागला आहे. यातून निवडणूक आयोगाची कोंडी झाली आहे. निवडणूक आयोगाने आता काँग्रेसला चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे.
निवडणूक आयोगाला (Election Commission) चारही बाजूने घेरलेलं असतानाच, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातील भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी निवडणूक आयोगावर विश्वास व्यक्त केला आहे. आमदार पाचपुते म्हणाले, "ही माझी निवडणुकीला आमदार म्हणून सामोरे जाण्याची पहिलीच वेळ आहे. पण माझा निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे. तरी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेत काही दोष किंवा शंका आढळल्यास, आमदारकीचा राजीनामा दोऊन निवडणूक प्रक्रियेला समोरे जाईल".
''ईव्हीएम' आणि 'व्हीव्हीपॅट' अनुभव आम्हाला 2019 मध्ये आला. वडील बबनराव पाचपुते यांनी त्यावेळी निवडणूक लढवली होती. विजयी झाले होते. त्यावेळी विरोधकाने फेरमोजणीची मागणी केली होती. मोजणीनंतर त्यात कोणतीही तफावत आली नाही. मी त्यावेळी प्रतिनिधी म्हणून उपस्थित होतो. त्यावेळी महाराष्ट्रात सर्वात शेवटी श्रीगोंद्याचा लागला होता. त्यामुळे 'ईव्हीएम' आणि 'व्हीव्हीपॅट' संदर्भात मला अडचण वाटत नाही' असेही आमदार पाचपुते यांनी म्हटले.
'लोकसभा निवडणुकीवेळी फेरमोजणीची मागणी झाली होती. त्यावेळी याच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चेष्टेवारी नेले होते. लोकसभेला जनतेचा कौल मान्य आहे, तर आता वेगळं काय घडलं आहे. तीच यंत्रणा आहे, तेच मतदार आहेत. फक्त मतदारांनी कौल बदलला आहे. निकाल बदलला आहे. तो मान्य नाही, हे दुर्दैवी आहे. लोकशाहीला घातक आहे. महाविकास आघाडी लोकशाहीला घातक आहे', असा देखील टोला पाचपुते यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.