Ram Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ram Shinde : 'या' कारणामुळे आली भाजप आमदार राम शिंदेंवर उपोषणाची वेळ !

Political News : नगर जिल्हा प्रशासनाच्या दप्तर दिरंगाई कारभाराविरोधात आमदार राम शिंदे उद्यापासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करणार

Pradeep Pendhare

Nagar News : भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी आता जिल्हा प्रशासनाविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कुकडी आवर्तन आणि निमगाव गांगर्डा (ता. कर्जत) तलाठी इमारतीच्या ना-हरकत प्रमाणपत्रासाठी आमदार शिंदे हे चांगलेच आक्रमक झालेत. जिल्हाधिकारी यांना पत्र देत उद्यापासून (ता. २०) बेमुदत उपोषणाला बसत असल्याचे आमदार शिंदे यांनी म्हटले आहे.

यानिमित्ताने पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांना घेरण्याचा प्रयत्न आमदार शिंदे यांचा असणार आहे. तसेच विखे पिता-पुत्र आणि आमदार शिंदे यांची पक्षांतर्गत असलेली धुसफूस यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर येताना दिसत आहे.

भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) हे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला पराभूत झाल्यापासून पक्षात आलेल्या विखे पिता-पुत्राविरुद्ध नेहमीच आक्रमक राहू लागलेत. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीची देखील त्यांनी तयारी केली आहे.

पक्षश्रेष्ठींकडे लोकसभा २०२४ साठी निवडणूक लढण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यासाठी ते लोकसभा २०२४ साठी केंद्रीय नेतृत्वाच्या सतत संपर्कात असतात. विखे आणि शिंदे यांच्यातील हा संघर्ष अलीकडच्या काळात जास्तच उफळलला आहे.

दिवाळीनंतर तर या राजकीय संघर्षाने टोक गाठलेय. यातून आमदार शिंदे यांनी विखे विरोधकांना नगर दक्षिण मतदार संघामध्ये एकत्र केले आहे. विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांना आमदार शिंदे यांनी खूपच जवळ केले आहे. "नगर दक्षिण"मधील अनेक कार्यक्रमांना शिंदे-लंके एकत्र हजेरी लावतात. आमदार निलेश लंके हे अजित पवार गटाकडे आहेत. परंतु त्यांचे शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून लोकसभा २०२४ साठी नाव चर्चेत येत आहे.

लोकसभा २०२४ ची निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे, तसा आमदार शिंदे यांनी पुन्हा विखेंविरुद्धचा संघर्ष तीव्र केला आहे. यातच ते कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील ग्रामपंचायत तलाठी कार्यालयाच्या इमारतीचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि श्रीगोंदा कुकडी आवर्तनाचा विषयावर आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन उपोषणाचा इशारा दिला आहे. आमदार शिंदे हे उद्यापासून (ता.२०) जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी सोडण्याबाबत वेळोवेळी मागणी केली. कुकडी विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिशाभूल करुन खोटी उत्तरे दिली. पाणी शिल्लक असताना देखील शेतकऱ्यांना वेठीस धरुन आवर्तन सोडले नाही. यातून शेतकऱ्यांच्या मनात सरकारविरोधात संताप निर्माण होईल आणि शेतक-यांचे कधीही न भरुन निघणारे नुकसान केल्याचे कृत्य केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नियमात नसतांना देखील बेकायदेशीररित्या परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव पाठवून, वेळ काढूपणा केला. याबाबत १२ फेब्रुवारीच्या जिल्हास्तरीय टंचाई आढावा बैठकीत कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्याविरुद्ध निलंबनाची आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री विखे यांनी दिले होते. यावर अद्याप कारवाई झाली नाही. ती होण्यासाठी बेमुदत उपोषण करत असल्याचे आमदार शिंदे यांनी म्हटले आहे.

निमगांव गांगर्डा (ता. कर्जत) येथील ग्रामपंचायत तलाठी कार्यालयाची इमारत बांधकामासाठी जिल्हा प्रशासन कार्यालयाकडे ना-हरकत प्रमाणपत्रासाठी दोन वर्षापूर्वी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याने दिसते. याशिवाय पालकमंत्री यांनी देखील ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याचे दिसते. यात दप्तर दिरंगाई झाल्याचे स्पष्ट होते. जिल्हाधिकारी यांनी तत्काळ कारवाई करतो, असे उत्तर दिले होते. परंतु कारवाई न झाल्यामुळे आमदार शिंदे हे आक्रमक झाले असून उद्या (ता. २०) जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेर सकाळी अकरा वाजल्यापासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे म्हटले आहे.

आमदार शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांना घेण्याचा प्रयत्न या आंदोलनातून करताना दिसत आहे. विखे आणि शिंदे दोन्ही दिग्गज नेते भाजपमध्ये आहेत. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखे आणि शिंदे यांच्यामधील हा संघर्ष भाजपला परवडणारा नाही. आमदार शिंदे उद्या बेमुदत उपोषणाला बसल्यास हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालकमंत्री विखे हे उद्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून यावर काय तोडगा काढतात याकडे लक्ष लागले आहे.

SCROLL FOR NEXT