Ahmednagar Political News : अलीकडच्या काळात काही लोकप्रतिनिधी खासगी मालकीच्या संस्था नामनिर्देशित करून सहकारी संस्था मोडीत करण्याचा डाव रचतात. त्यांचा हा कुटील डाव हाणून पाडू, असा इशारा भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांना दिला आहे. कर्जत तालुक्यातील खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध करताच आमदार शिंदे थेट आमदार पवारांना भिडल्याने राजकीय वातावरण तापले.
कर्जत तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध करण्यात आमदार प्रा. राम शिंदेंना (Ram Shinde) यश आले आहे. या निवडणुकीसाठी विविध मतदारसंघातून तब्बल 36 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 13 संचालक सर्वानुमते बिनविरोध करण्यात आल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी दिली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे उपस्थित होते.
खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीच्या 13 जागेसाठी 36 अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेत हे सर्व अर्ज वैध ठरले. कर्जत तालुका खरेदी-विक्री संघात प्रामुख्याने डॉ. ए. बी. चेडे आणि प्रकाश चेडे यांचे प्राबल्य आहे. संस्थेची एकूण अवस्था पाहता त्यास उर्जितावस्था यावी यासाठी आमदार शिंदेंनी जातीने लक्ष दिले.
यातून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा चंग त्यांनी बांधला होता. त्यास चेडे कुटुंबीय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी आमदार शिंदे यांनाच निवडीचे सर्वाधिकार दिले. त्यानंतर शिंदेंनी सर्व उमेदवारांशी चर्चा घडवत निवडणूक बिनविरोध केली. तर उर्वरीत उमेदवारांना आपले अर्ज माघारी घेण्याची विनंती केली होती.
आमदार शिंदे म्हणाले, 'अलीकडच्या काळात काही लोकप्रतिनिधी खासगी मालकीच्या संस्था नामनिर्देशित करून मतदारसंघातील सहकारी संस्था मोडीत काढण्याचे प्रयत्न करीत आहे. परंतु त्यांचा हा कुटील डाव आणि कारस्थान कदापि यशस्वी होऊ देणार नाही,' असे नाव न घेता शिंदेंनी रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर निशाणा साधला. 'कर्जत तालुका खरेदी-विक्री संघ पुन्हा उर्जित अवस्थेत आणून या संस्थेचे वैभव पुन्हा प्राप्त करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करणार आहे,' असा शब्दही शिंदेंनी यावेळी दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बिनविरोध संचालक मंडळ
(अ) वर्ग सभासद सहकारी संस्था सर्वसाधारण प्रतिनिधीः मच्छिंद्रर कोल्हे, सुखदेव मुळीक, अण्णासाहेब महारनवर, सतीश सुद्रीक, रामदास सुर्यवंशी, राजेंद्र निकत.
(ब) वर्ग वैयक्तिक सभासद प्रतिनिधीः सर्जेराव बावडकर, ज्ञानदेव गांगर्डे.
अनुसूचित जाती-जमातीः राजेंद्र त्र्यंबके.
महिला राखीव प्रतिनिधीः आशा अमृत बनकर, वैशाली चंद्रशेखर खरमरे.
इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधीः प्रकाश चेडे.
भटक्या, विमुक्त जाती-जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधीः तुकाराम जवणे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.