Chief Minister Devendra Fadnavis And Sudhakar Badgujar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics : पक्षाचं उघडलं दार पण कार्यकारिणीचं बंदच ठेवलं, बडगुजरांना भाजपने थोडं दूरच ठेवलं..काय कारण?

BJP Nashik city committee, Sudhakar Badgujar : शिवसेना (उबाठा) मधून भाजपमध्ये प्रवेश केलेले सुधाकर बडगुजर व मामा राजवाडे दोघांनाही शहर कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेलं नाही. त्याची चर्चा होत आहे.

Ganesh Sonawane

BJP Nashik : नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांचा विरोध असतानाही आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सुधाकर बडगुजर यांना भाजपने पक्षाची दारं खुली केली व पक्षात प्रवेश दिला. मात्र भाजपने शहर कार्यकारिणी पासून सुधाकर बडगुजर यांना जरा दूरच ठेवलं आहे. कार्यकारिणीमध्ये बडगुजर यांना कुठेही स्थान देण्यात आलेले नाही. त्याची सध्या नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

भाजपने नुकतीच २०२५-२८ या तीन वर्षांसाठी शहराची कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीवर घराणेशाहीची छाप दिसून येत असल्याचे दिसत आहे. प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबातीलच लोकांना कार्यकारिणीत स्थान दिल्याचं दिसत आहे. परंतु कार्यकारिणीत सामाजिक समतोल राखण्यात आल्याचा दावा भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केला आहे.

भाजपने जाहीर केलेल्या पावणे दोनशे जणांच्या जंबो शहर कार्यकारिणीत शिवसेना (उबाठा) मधून भाजपत दाखल झालेल्या सुनिल बागुल व माजी मंत्री बबनराव घोलप यांना विशेष निमंत्रितांच्या यादीत स्थान दिलं आहे. मात्र सुधाकर बडगुजर यांना कुठेही स्थान देण्यात न आल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. बडगुजर यांना पक्षात घेतानाच त्यांना केवळ पक्षात घेतलं जाईल अन्य कुठलही महत्वाचं पद दिलं जाणार नाही असं ठरलं होतं का किंवा तसा शब्द कुणाला दिला गेला होता का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

दुसरीकडे उबाठातून भाजपत प्रवेश केलेले सुनिल बागुल यांचे निकटवर्तीय मामा राजवाडे यांनाही कार्यकारिणीमध्ये स्थान मिळालेलं नाही. इतकच काय तर विधानसभेला बंडखोरी केलेल्या गणेश गिते यांनाही पक्षाने कार्यकारिणीपासून दूरच ठेवलं आहे. याशिवाय माजी आमदार बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, माजी महापौर सतीश कुलकर्णी, विजय साने, प्रदीप पेशकार, माजी शहराध्यक्ष प्रशांत जाधव, गिरीश पालवे, महेश हिरे, माजी आमदार निशिगंधा मोगल यांनाही कार्यकारिणीत स्थान न देऊन प्रत्यक्षपणे थांबण्याचा सल्ला दिलेला दिसत आहे.

भाजप शहर कार्यकारिणीमध्ये १० उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस, १० चिटणीस यांच्यासह भाजपप्रणीत ३६ आघाड्यांच्या प्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल ९८ सदस्य आणि १२ जणांचा विशेष निमंत्रितांचा यादीत समावेश आहे. भाजप नेतृत्वाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यकारिणी तयार केल्याचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी सांगितलं आहे. परंतु अनेक महत्वाच्या नेत्यांना या कार्यकारिणीत डावलण्यात आल्याने कार्यकारिणी चर्चेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT