Sharad Pawar, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics : नाशिक जिल्ह्यात भाजपकडून नुसता फोडाफोडीचा धडाका, थेट महाविकास आघाडीच्या उमेदवारांवरच घाव

BJP Nashik Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर नाशिक जिल्ह्यात भाजपच्या इनकमिंग मोहिमेला चांगलाच जोर आला आहे. एक-एक करत नेते गळाला लावले जात आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिक जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने भाजपने मोठी इनकमिंग मोहीम हाती घेतली आहे. महाविकास आघाडीसह मित्रपक्षांचे नेतेही भाजप गळाला लावत आहे. खासकरुन महाविकास आघाडीचे उमेदवार फोडून आपली ताकद वाढवण्याची रणनिती भाजपने अवलंबवल्याचे दिसते.

भाजपने राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर तालुक्यातून आपली मोहीम सुरु केली. कोकाटे यांच्याविरोधात निवडणूक लढवलेले सिन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार उदय सांगळे यांनाच भाजपने गळाला लावलं. त्यापाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाचे भारत कोकाटे, हेमंत वाजे या सगळ्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांना भाजपने आपल्या गोटात सामील केलं आहे. सिन्नर तालुक्यात आपली ताकद वाढवत राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांना शह देण्याची पुरेपुर तयारी भाजपने केली.

दिंडोरी तालुक्यातही भाजपने असाच डाव टाकला. तिथे राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात निवडणूक लढवलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनिता चारोस्कर व त्यांचे पती रामदास चारोस्कर यांना भाजपने गळाला लावत पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपची ताकद वाढलीच याशिवाय पुढच्या विधानसभेला दिंडोरीत भाजपचा उमेदवार द्या असं आवाहन गिरीश महाजन यांनी केल्याने झिरवाळाचं टेन्शन वाढलं ते वेगळच.

त्यानंतर इगतपुरी तालुक्यातही शिवसेना उबाठाचे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनीही काही नगरसेवक व आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. इगतपुरी नगरपरिषदेत इंदुलकर यांची सत्ता असतानाही भाजपने अशी काय जादूची कांडी फिरवून त्यांना गळाला लावलं हे कुणालाच उमगलं नाही. परंतु उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी तो मोठा धक्का ठरला.

त्यानंतर चांदवड तालुक्यात भाजपने चक्क कॉंग्रेसचा जिल्हाध्यक्षच फोडला. शिरीष कोतवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यामुळे तालुक्यातील उरलीसुरली कॉंग्रेस गायब झाली. आता चांदवड तालुक्यात भाजपची ताकद आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे शिरीष कोतवाल यांनी विधानसभेला कॉंग्रेसकडून भाजपचे राहुल आहेर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तरीही राहुल आहेर यांनीच कोतवाल यांच्या भाजप प्रवेशात मुख्य भूमिका निभावली.

मनमाड तालुक्यात तर भाजपने सुरुवातीलाच शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभेचे उमेदवार गणेश धात्रक यांना गळाला लावत भाजप प्रवेश घडवून आणला होता. एक-एक करत भाजप सगळ्याच तालुक्यांमध्ये जाळे टाकताना दिसत आहे. खासकरुन महाविकास आघाडीचे उमेदवार फोडून भाजपने नाशिक जिल्ह्यात आपली ताकद वाढवली आहे. त्यानंतर भाजपने मित्रपक्षांकडे देखील आपला मोर्चा वळवल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT