Congress Vs BJP News: काँग्रेस पक्षाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. सर्वाधिक जागा जिंकण्याचा त्यांचा संकल्प आहे. विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांना भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले जात आहे.
कदाचित यामुळेच नगर जिल्हा भाजपला विशेष महत्त्वाचा वाटत असावा. नगर जिल्ह्यासाठी गुजरातचे भाजपचे खास ट्रबल शूटर आमदार दाखल झाले आहेत. यातील दोन आमदार थेट काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना घेरण्याची रणनीती आखत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यंदा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. या निवडणुकीसाठी त्यांच्या विश्वासातली गुजरात येथील विविध आमदार आणि मंत्री या निवडणुकीत थेट रणनीती राबविणार आहे. त्याचे काम देखील प्रत्यक्ष सुरू झाले आहे.
गुजरातचे आमदार जगदीश मकवाना आणि किशोरीलाल बेनीवाल हे कालपासून संगमनेर मतदारसंघात काम करीत आहेत. पुढील दोन महिने निवडणूक होईपर्यंत ते येथे तळ ठोकणार आहेत. नगर जिल्ह्यातील १३ मतदारसंघात काय नियोजन करायचे, याची बैठक बुधवारी नाशिकला झाली.
या बैठकीसाठी गुजरातहून काही आमदार नाशिकला आले होते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी विचार मंथन झाले. त्यानंतर नगर जिल्ह्याच्या प्रत्येक मतदारसंघासाठी एका आमदाराची नियुक्ती करण्यात आली. हे आमदार लगेचच संबंधित मतदारसंघात दाखल झाले आहेत. या आमदारांनी आज स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कामाला सुरुवात केली.
यंदाच्या निवडणुकीत भाजपची संघटनात्मक यंत्रणा सक्रिय करण्यावर त्यांचा भर असेल. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे साहेबराव नवले यांचा ६२ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यांच्या विरोधात आमदार थोरात यांना १.२५ लाख मते मिळाली होती.
संगमनेर मतदारसंघात सुरुवातीला यंदाच्या निवडणुकीत वेगळे वारे वाहत होते. आमदार थोरात यांच्या कन्या कॅन्सर तज्ञ डॉ जयश्री थोरात-देशमुख यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून घेतले जात होते. मात्र काँग्रेस पक्षाने श्री थोरात यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. यंदा त्यांची नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेस महा समितीच्या सदस्यपदी झाली आहे.
त्यामुळे सध्या भावी मुख्यमंत्री म्हणून आमदार थोरात यांना प्रमोट केले जात असल्याची चर्चा संगमनेरच्या मतदारांत देखील आहे. यंदा भावी मुख्यमंत्र्याला मतदान करायचे, हे स्पिरिट सध्या मतदारांमध्ये रुजविले जात आहे आहे. कदाचित या सर्व घडामोडींमुळेच भाजपचे केंद्रीय नेतृत्व अमित शहा यांनी संगमनेर मतदारसंघासाठी खास नियोजन केले असावे.
गुजरात मधील निवडणुकीचा दीर्घ अनुभव असलेले हे आमदार राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या योजना समाजाच्या दृष्टीने किती हिताच्या आहेत. त्यातून भविष्यात मतदारांचा कसा विकास होईल. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत येणे किती आवश्यक आहे. हे प्रत्येक कार्यकर्त्यांवर बिंबविण्याचे काम करणार आहेत.
त्यासाठी जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांनंतर विशेष नियोजन केले जाईल. त्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विश्वास असलेले हे आमदार काय चमत्कार घडवतात याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.