BJP Vs Unmesh Patil: नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्प प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या पुढाकाराने गिरणा धरणावर या संदर्भात बैठक झाली या बैठकीत राज्य शासनाला इशारा देण्यात आला.
नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्प रेंगाळला आहे. जळगावचे नेते गिरीश महाजन प्रदीर्घकाळ जलसंपदा मंत्री होते. या सबंध कालावधीत या प्रकल्पासाठी ठोस काहीही झाले नाही. असा विरोधकांचा आरोप आहे.
या पार्श्वभूमीवर नुकताच केंद्र शासनाचे मंत्री आर. सी. पाटील यांनी हा प्रकल्प नामंजूर केला. त्यावरून आता राजकारण पेटले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांनी या प्रश्नावर सर्वपक्षीय आंदोलन उभे केले आहे.
या संदर्भात विविध संघटनांना आणि राजकीय पक्षांना बरोबर घेऊन काल गिरणा धरणावर मोठी बैठक झाली. या बैठकीत गिरणा खोरे तुटीचे आहे. येथे पाण्याची टंचाई आहे. सिंचनाचा प्रश्न गंभीर आहे. तरीही मंत्री हातावर हात धरून बसले आहेत, असा आरोप करण्यात आला.
तापी खोऱ्यातील आणि नार-पार खोऱ्यातील पाणी गुजरातला जाते आहे. हे हक्काचे पाणी गिरणा खोऱ्यात वळविणे आवश्यक आहे. मात्र त्यावर काहीच झाले नाही. त्यामुळे आता जनतेलाच मैदानात उतरून या प्रश्नावर सरकारला जागे करावे लागेल, असा इशारा यावेळी माजी खासदार उन्मेष पाटील यांनी दिला.
या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे नार-पारचे आंदोलन केवळ जळगाव जिल्हापुरते मर्यादित न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील खानदेश भागातील नागरिक असलेल्या ठिकाणी जाऊन सभा घेण्याचे ठरले. कल्याण, डोंबिवली, ठाणे, पिंपरी चिंचवड, नाशिक आणि अगदी गुजरातला सुरत येथे जाऊन सभा घेतल्या जाणार आहेत.
गिरणा धरण ते रामेश्वरम या भागात ४० जलपरिषदा घेण्यात येतील. विशेष म्हणजे खानदेश मधील सर्व ३२ विधानसभा मतदारसंघात जाऊन या विषयावर जनजागरण केले जाणार आहे. हा निर्णय अतिशय सुचक आहे.
खानदेशच्या ३२ मतदारसंघात सध्या भाजपचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याचे काम माजी खासदार पाटील यांच्या माध्यमातून होणार आहे. त्यात नार-पार आणि तापीचे पाणी गुजरातला वाहून जाते. हे पाणी अडविण्यासाठी गेल्या दहा वर्षात काहीही प्रयत्न झाला नाही. त्यामुळे एक प्रकारे खानदेश मधील सर्व मंत्री गुजरातच्या दबावाखाली आहेत, असा संदेश देण्याचा प्रयत्न असू शकतो.
हे आंदोलन म्हणजे भारतीय जनता पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न दिसतो. त्यामुळे आता नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पावरील राजकारण अधिक तीव्र स्वरूप धारण करणार असे दिसते.
खानदेशी हितसंग्राम समिती, गिरणा मन्याड बचाव समिती, पांझण डावा कालवा बचाव समिती, वांजुळ पाणी समिती, खानदेश जलपरिषद, जामदा कालवा समिती, मिशन ५०० कोटी लिटर या विविध संस्था या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.
खानदेश हितसंग्राम समितीचे भैय्यासाहेब पाटील, बापूसाहेब हटकर, वांजूळ पाणी संघर्ष समितीचे के. एन. अहिरे, मालेगावचे निखिल पवार यांसह विविध सरपंच आणि सर्वच राजकीय पक्षांचे नेते या बैठकीत सहभागी झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील यांसह विविध पक्षांचे नेते देखील सहभागी झाले. या बैठकीकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जाते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.