Corporator shouting in mahasabha
Corporator shouting in mahasabha Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

निवडणुकीच्या तोंडावर भाजपने रेटला नोकरभरतीचा प्रस्ताव

Sampat Devgire

नाशिक : शहराचा विस्तार वाढत असताना महापालिका प्रशासनावर अपुऱ्या मनुष्यबळामुळे सेवा पुरविण्यावर ताण निर्माण होत असल्याने सत्ताधारी भाजपने निवडणुकीच्या तोंडावर मानधनावर नोकरभरती करण्याच्या महासभेच्या प्रस्तावाला मान्यता दिली. भाजपने निवडणुकीच्या तोंडावर गाजर दाखविल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

काल झालेल्या महासभेत कर्मचारी पातळीवर आणीबाणीची परिस्थिती असल्याच्या पार्श्‍वभूमीवर स्थायी समिती सभापती गणेश गिते, सदस्य मुकेश शहाणे, प्रतिभा पवार, माधुरी बोलकर या भाजप सदस्य तसेच शिवसेनेच्या रत्नमाला राणे यांनी सर्व संवर्गातील पदांवर अकरा महिन्यांच्या कालावधी साठी मानधनावर कर्मचारी नियुक्त करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावर चर्चा करण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी महासभा बोलाविली होती. चर्चेअंती निर्णय देताना महापौर कुलकर्णी यांनी आयुक्तांनी भरती संदर्भात शक्य तितक्या जागांवर नियमानुसार मानधनावर नोकरभरतीचा निर्णय दिला.

महापालिकेत गेल्या चोवीस वर्षात भरती न झाल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण निर्माण होत असून, त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहे. महापालिकेला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाला असल्याने चौदा हजार पदांचा आकृतिबंध शासनाकडे प्रलंबित आहे.

शिवसेनेचे नियमावर बोट, भाजपची कोंडी

शिवसेनेकडून नियमावर बोट ठेवल्याने सत्ताधारी भाजपची कोंडी झाली. नोकरभरतीचा प्रस्ताव प्रशासनाकडून येणे अपेक्षित होते, परंतु महासभेने सादर केल्याने प्रशासनावर बंधनकारक नाही. नोकरभरतीला मान्यता दिली तरी शासन मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावा लागणार असल्याचे शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी ठोकून सांगताना आयुक्त जाधव यांनी देखील वैद्यकीय व अग्निशमनची ६३५ पदांना आस्थापना खर्चामुळे मान्यता मिळाली नसल्याची कबुली दिल्याने बडगुजर यांच्या दाव्याला बळ मिळाले.

विलास शिंदे यांनी स्थानिकांना न्याय देण्यासाठी मानधनावर नोकरभरतीचे समर्थन केले. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी भरती झाली पाहिजे, परंतु फसवी घोषणा नसावी. यापूर्वी चार नोकरभरतीचे प्रस्ताव शासनाने गुंडाळले. त्यात पाचव्या प्रस्तावाची भर पडण्यापलिकडे हाती काहीच पडणार नसल्याचे सूचित करताना प्रस्ताव मंजुरी नंतर नोकरी लावून देण्याच्या नावाखाली आर्थिक लुटीची भीती व्यक्त केली.

पाच वर्षांपूर्वी नोकरभरतीचा प्रस्ताव येणे गरजेचे होते, परंतु निवडणुकीच्या तोंडावर प्रस्ताव सादर करणे योग्य नाही. भाजपचा अजेंडा राबविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असून, बेरोजगारांच्या भावनांशी खेळणे योग्य नसल्याची टीका काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी केली. वेळ कमी असल्याने भरती शक्य नाही. त्यामुळे निवडणुकीचे गाजर असल्याचा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादीचे गजानन शेलार यांनी राष्ट्रवादीचा स्पष्टपणे विरोध नोंदविताना भरती न झाल्यास सत्ताधाऱ्यांच्या दारासमोर आंदोलनाचा इशारा दिला. काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांनी भरती आवश्‍यक असली तरी वेळ नसल्याने फसवणुकीची शक्यता व्यक्त केली. मनसेचे सलीम शेख यांनी नोकरभरतीचा प्रस्ताव मंजूर करताना निवडणुकीच्या तोंडावर गाजर नको अशी टिप्पणी केली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT