Nashik APMC Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik APMC : भाजपने उलथवली राष्ट्रवादीची सत्ता; चुंभळेंच्या खांद्यावर बंदूक ठेवत महाजनांचा सर्जिकल स्ट्राईक?

Nashik APMC : माजी खासदार आणि सभापती देविदास पिंगळे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव आज (11 मार्च) संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर झाला. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बोलावलेल्या बैठकीत 15 विरुद्ध 3 अशा बहुमताने हा अविश्वास ठराव मंजूर झाला आहे.

Hrishikesh Nalagune

Nashik News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता भाजपने उलथवून लावली आहे. माजी खासदार आणि सभापती देविदास पिंगळे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव आज (11 मार्च) संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर झाला.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बोलावलेल्या बैठकीत 15 विरुद्ध 3 अशा बहुमताने हा अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. नवीन सभापती निवडीपर्यंत उपसभापती विनायक माळेकर यांच्याकडे प्रभारी सभापदीपदाची सुत्रे देण्यात आली आहेत.

नाशिक बाजार समितीत राष्ट्रवादीच्या देविदास पिंगळे यांचा एक गट आणि भाजपच्या शिवाजी चुंभळे यांचा एक असे दोन गट आहेत. एप्रिल 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीत पिंगळे गटाने 12 आणि चुंभळे गटाने 6 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर झालेल्या सभापती निवडणुकीत चुंभळे गटाने उमेदवार दिला नाही. त्यामुळे देविदास पिंगळे एकमताने सभापतीपदी निवडून आले.

मात्र दोन वर्षातच 12 पैकी 9 संचालकांनी पिंगळे यांच्या मनमानी कारभारावर टीका करायला सुरूवात केली. अखेर हे 9 संचालक चुंभळे गटाला जाऊन मिळाले. त्यानंतर शिवाजी चुंभळे यांनी पिंगळेवर अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू केली. आपले 6 आणि पिंगळे गटातून आलेले 9 अशा 15 संचालक हाताशी धरून सत्ता पिंगळे यांची सत्ता उलथवून टाकण्याचे नियोजन चुंभळे यांनी केले. या नियोजनाची कुणकुण लागताच पिंगळे सावध झाले.

भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पैसे देऊन संचालक फोडल्याचा आरोप पिंगळे यांनी केला होता. याबाबत अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे पिंगळे यांनी सांगितले. त्यामुळे अजित पवार यांच्या मध्यस्थीने हे बंड थंड करण्यात येईल अशी चर्चा झाली. पण अजित पवार यांना हे बंड थोपविण्यात अपयश आले. अखेर आज चुंभळे यांनी 15 संचालकांच्या मदतीने अविश्वास ठराव मंजूर करत राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.

दहा जणांना घडवली विदेश वारी :

शिवाजी चुंभळे यांचा महिनाभरापूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश झाला होता. त्यानंतर चुंभळे यांनी मागील आठवड्यात पिंगळेंविरोधात (3 मार्च) अविश्वास ठराव दाखल केला. ठराव दाखल होताच त्यांनी 10 संचालकांना परदेश सहलीवर पाठवून दिले.

हे सर्व संचालक काल (10 मार्च) रात्री उशिरा नाशिकमध्ये दाखल झाले. त्यानंतर ते थेट जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिले. एवढे काटेकोर नियोजन झाल्याने या ऑपरेशनला मंत्री गिरीश महाजन यांचा आशीर्वाद असणारच अशी चर्चा नाशिकमध्ये सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT