
Sangli News : भाजपचे तत्कालीन सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीडे दिला होता. यानंतर भाजपच्या जिल्हाध्यक्षपदावरून जिल्ह्यात बदलाचे वारे वाहताना दिसत असून कोणाला संधी मिळणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावाला हायकमांडने ग्रीन सिग्नल दिल्याची सध्या जिल्हा भाजपमध्ये चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान तत्कालीन जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी भाजप सोडली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुक लढवताना नशीब आजमावले होते. यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष पदाची खुर्ची रिकामी झाली होती. आता नवीन जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
सांगली ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद रिक्त झाल्यानंतर कोणाला संधी मिळणार? जबाबदारी कोणाकडे जाणार याकडे लक्ष अनेकांचे लागले होते. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आधी भाजपमध्ये बदल होईल असे संकेत मिळत आहेत. संग्राम सिंग देशमुख यांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील भाजपच्या बहुतांश नेत्यांची आणि गटांशी देशमुख यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे.
सध्या दीपक शिंदे-म्हैसाळकर भाजपचे प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. भाजप हा केंद्रात व राज्यात सत्तेत असून गाव पातळीवर कार्यकर्ता निर्माण करण्यासाठी सदस्य नोंदणी केली जातेय. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भाजपला पुर्णवेळ जिल्हाध्यक्ष नसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी विशेष कार्यक्रम आखले जात आहेत. तसेच रिक्त ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदावर देखील चर्चा केली जातेय. सध्या या गोष्टीकडे पक्षातील वरिष्ठांचे विशेष लक्ष असून पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष देण्याची प्रक्रियेला वेग आला आहे. यासाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून काहीच दिवसात भाजपकडून ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती केली जाऊ शकते. सध्या जिल्ह्यातील अनेक नेत्यांच्या नावांची चाचपणी केली आहे. पण भाजपने जिल्हाध्यक्षपदासाठी केलेल्या या चाचपणीत संग्रामसिंह देशमुख यांचे नाव आघाडीवर असून त्यांच्या नावाला हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याचे बोलले जात आहे.
संग्रामसिंह यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा अनुभव असून ते भाजपचे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. जिल्ह्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून लोकसभेवेळी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांचा जोरदार प्रचार केला होता. तर पलूस-कडेगाव मतदारसंघात केलेला प्रचार आणि आता जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून केलेल्या कामाच्या जोरावर ते ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष होऊ शकतात, असे बोलले जात आहे. पण आता भाजप त्यांना संधी देतं की आणखी कोणता दुसरा चेहरा समोर आणतं हेच पाहावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.