Sudhakar Badgujar : पक्षातरांच्या तयारीत असलेल्या सुधाकर बडगुजर यांचा मनसुबा वेळीच ओळखून उद्धव ठाकरेंनी तक्काळ बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यातून पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा संदेश ठाकरेंनी दिला खरा पण; त्यामुळे बडगुजर यांच्यासारखा ताकदवान नेता आपल्याकडे खेचून एकीकडे ठाकरे सेनेला कमकुवत करुन दुसरीकडे महापालिका निवडणुकीत अपेक्षित लक्ष गाठण्यासाठी बडगुजर यांचा उपयोग करुन घेण्याचा भाजपचा डाव काही प्रमाणात यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे.
भाजपची महापालिकेत सत्ता होती. शहरात तीन आमदार भाजपचे आहे. तरीही सुधाकर बडगुजर भाजपला हवे आहेत त्याचे कारण आगामी महापालिका निवडणूक आहे. भाजपने नाशिक महापालिका निवडणुकीवर पूर्णंता लक्ष केंद्रीत केलं आहे. कोणत्याही परिस्थिती भाजपला महापालिकेत पुन्हा सत्ता स्थापन करायची आहे. म्हणून भाजपने ठाकरे सेनेमधील हा बलाढ्य सैनिक आपल्या गळाला लावण्यासाठी मोठा डाव टाकला.
आगामी महापालिका निवडणुकीत भाजपने १०० हून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे ध्येय ठेवले आहे. बडगुजर यांच्यासारख्या दुसऱ्या पक्षातील एका-एका बलाढ्य सैनिकाला आपल्या पक्षात घेऊन भाजपला हे ध्येय गाठायचे आहे. त्यासाठी निवडणुकीपूर्वी शक्य होईल तेवढे पक्षप्रवेश करुन घ्या असे आवाहनच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
शिवसेनेमध्ये ज्यावेळेला फूट पडली त्यावेळी अजय बोरस्ते यांच्या सोबत बारा ते पंधरा नगरसेवकांचा गट शिंदे गटात गेला. तेव्हा ठाकरे यांच्या उर्वरित सेनेला खऱ्या अर्थाने जर कुणी बळ दिलं असेल तर ते बडगुजर यांनीच. लोकसभा निवडणुकीच्या वेळेलाही ठाकरे गटाने सिन्नरचे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली. त्यावेळी राजाभाऊ यांच्या मागे शहरातून ताकद उभी करण्यासाठी याच बडगुजर यांनी जीवाचं रान केलं होतं. तेव्हापासूनच बडगुजर याचं नेतृत्व भाजपच्या नजरेत भरलं होतं.
बडगुजर यांना त्याचं फळ म्हणून ठाकरे गटाने पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र त्यावेळीही भाजपकडून असे काही फासे टाकले गेले की बडगुजर निवडणुकीत एकाकी पडले. त्यानंतर थेट त्यांच्या कुटुंबावरच आघात झाला, त्यातून ते वरमले. भाजपला शरण आले असही म्हणायला हरकत नाही. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटात नाराज असल्याचं वक्तव्य केलं. फडणवीस यांची भेट घेतली. ठाकरे गटातून त्यांची हकालपट्टी झाली. परंतु भाजपने टाकलेला हा डाव ठाकरेंच्या कदाचित लक्षात आला नाही.
त्यामुळे आता यात दोन गोष्टी आहेत. एकतर बडगुजर यांच्या मदतीने महापालिकेत १०० प्लस चा आकडा गाठण्यात भाजप कितपत यशस्वी होतं हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईलच. तर दुसरीकडे शिंदे शिवसेनेने व भाजपने एक-एक करुन मोठे मासे गळाला लावून खिळखिळी केलेली उद्धव ठाकरेंची सेना यातून कशी सावरते हेही पाहावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.