
Harsvardhan Sapkal : जळगाव जिल्ह्यात काँग्रेसने राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवत नवा डाव टाकला आहे. पक्षातर्गंत गटबाजी रोखण्यासाठी कॉंग्रेसने जिल्ह्यात भाकरी फिरवली आहे. पक्षाच्या या अनपेक्षित भूमिकेमुळे अंतर्गत घडामोडींना चालना मिळाली असून, जिल्हा परिषद ते नगरपालिकांपर्यंतच्या आगामी निवडणुकांवर या निर्णयाचे पडसाद कसे उमटतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावल ग्रामीण, यावल शहर आणि जामनेर या तीन तालुक्यांत काँग्रेसने अनपेक्षित फेरबदल करत राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण केली आहे. यावल शहराध्यक्षपदासाठी कदीरखान यांना बाजूला ठेवत मो. हकीम मो. युसून यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवला आहे. तर यावल ग्रामीणमध्ये प्रभाकर सोनवणे यांना वगळत शेखर सोपान पाटील यांना संधी देण्यात आली आहे. जामनेर तालुक्यातही शंकर राजपूत यांची जागा शरद त्र्यंबक पाटील यांनी घेतली असून, या बदलांमुळे गटबाजी कमी होईल अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्षांना आहे. परंतु प्रत्यक्षात पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर पक्षात झालेले बदल काय परिणाम साधतात हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात काँग्रेसची ढासळती अवस्था आणि अंतर्गत गटबाजी ही प्रदेश नेतृत्वासाठी मोठे आव्हान ठरत होती. या पार्श्वभूमीवर पक्षाने श्याम उमाळकर यांची विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करत जिल्ह्याचा सखोल आढावा घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. उमाळकर यांनी तालुकास्तरावर दौरे करून पक्षातील स्थितीचा बारकाईने अभ्यास केला आणि आपला अहवाल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्त केला होता.
उमाळकर यांनी पाठवलेल्या अहवालाच्या शिफारशींचा आधार घेत, तसेच गटबाजीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रदेशाध्यक्षांच्या निर्देशानुसार काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी या नियुक्त्यांचे आदेश तत्काळ जारी करत, "बदल अपरिहार्य असून, काँग्रेस नव्या वाटचालीसाठी सज्ज आहे," असा स्पष्ट संदेश दिला आहे.
जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट व उबाठा शिवसेना पक्षाला गळती लागली असताना मात्र कॉंग्रेसमध्ये तुलनेने काहीसे बरे चित्र आहे. कॉंग्रेसने यावल मध्ये नुकताच मोठा पक्षप्रवेश घडवून आणला. प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश न करता काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे स्वाभाविकपणे महायुतीच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसची रावेर-यावल तालुक्यात हळूहळू ताकद वाढत चालल्याचे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.