Ahilyanagar Manmad Highway News : अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून नागरिकांचा संताप वाढत असताना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आता थेट डिसेंबरची डेडलाइन दिली आहे. “हा रस्ता फक्त सुजय विखेच पूर्ण करू शकतो,” असा दावा करत त्यांनी नागरिकांना काही काळ संयम ठेवण्याचे आवाहन केले.
दरम्यान, इराणवरील बॉम्बहल्ले, युद्धजन्य परिस्थिती आणि डांबराच्या तुटवड्याचा संदर्भ देत विखे पाटील यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही टीका केली.
देवळाली प्रवरा येथे आयोजित ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. माजी आमदार चंद्रशेखर कदम अध्यक्षस्थानी होते. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या (Highway) कामावरून केवळ आंदोलन करणे किंवा समाजमाध्यमांवर पोस्ट करणे हा उपाय नसल्याचे सांगत विखे पाटील यांनी या प्रश्नावर आपण गांभीर्याने काम करत असल्याचा दावा केला.
नागरिक आणि कार्यकर्त्यांनी काही काळ संयम ठेवावा. महामार्गामुळे होणाऱ्या त्रासाची जाणीव असून या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. डिसेंबरपर्यंत नागरिकांची महामार्गाच्या समस्येतून सुटका होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “हा रस्ता फक्त सुजय विखेच पूर्ण करू शकतो,” असे विधान करत विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी महामार्गाच्या कामाबाबत स्वतःवरच विश्वास व्यक्त केला.
महामार्गाच्या रखडलेल्या कामामागे युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम असल्याचा दावा विखे पाटील यांनी केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीवर टीका करत इराणवरील बॉम्बहल्ल्यानंतर डांबराच्या उपलब्धतेवर आणि दरांवर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.
अहिल्यानगर-कोपरगाव महामार्गाच्या कामालाही डांबराच्या तुटवड्यामुळे दिरंगाई होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. अहिल्यानगरमध्ये सुमारे 40 हजार कोटी रुपयांची विकासकामे केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. आपल्या भाषणात विखे पाटील यांनी मिश्कील टिप्पणीही केली. “मी मेंदूचा डॉक्टर आहे; मात्र राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला.
दरम्यान, सिस्पे प्रकरणातील आरोपींना आपल्या कार्यकर्त्यांनी शोधून काढल्याचा दावा खासदार नीलेश लंके यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी त्यांच्यावर उपरोधिक टीका केली. “डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, बल्कि नामुमकिन था. पण ही नामुमकिन गोष्ट खासदारांनी केली असेल, तर त्यांना नक्कीच ‘रॉ’चे अध्यक्ष करायला पाहिजे,” असा टोला विखे पाटील यांनी लगावला.
आरोपींचा शोध घेण्याच्या दाव्यावरून विखे पाटील यांनी उपरोधाच्या माध्यमातून खासदार लंके यांना लक्ष्य केले. त्यामुळे एका बाजूला अहिल्यानगर-मनमाड महामार्ग पूर्ण करण्याची डिसेंबरची डेडलाइन, तर दुसऱ्या बाजूला ट्रम्प आणि लंके यांच्यावर केलेल्या टीकेमुळे विखे पाटील यांचे भाषण राजकीय चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.