

Sujay Vikhe statement on Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीमुळे भारतात दारू पिणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचा अजब दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे.
ट्रम्प यांना थेट ‘वेडा माणूस’ संबोधतानाच, त्यांच्या बदलत्या भूमिकांमुळे काही लोक मद्यपानाकडे वळल्याचा दावा विखे पाटील यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
अहिल्यानगर-मनमाड रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत बोलताना भाजपचे सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी हा दावा केला. रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या डांबराच्या उपलब्धतेवर परिणाम झाल्याचे सांगताना त्यांनी जागतिक युद्धस्थिती आणि क्रूड ऑइल पुरवठ्याचा संदर्भ दिला.
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या भूमिकेवर टीका करताना विखे पाटील म्हणाले की, हा माणूस रात्री एक बोलतो, सकाळी दुसरे बोलतो आणि दुसऱ्या दिवशी वेगळेच काही सांगतो. कधी युद्ध संपल्याचे सांगतो, तर लगेच दुसऱ्या दिवशी मिसाईल हल्ल्याची भूमिका घेतो, असा आरोपही त्यांनी केला. या बदलत्या भूमिकांचा भारतातील काही लोकांवरही परिणाम होत असल्याचा अजब दावा त्यांनी केला. ट्रम्प यांच्या कृतीमुळे गोंधळलेल्या काही लोकांच्या दारू पिण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे विखे पाटील यांनी म्हटले.
विखे पाटील यांनी आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार करताना ट्रम्प यांच्या युद्धनीतीमुळे भारतातही विचित्र परिणाम होत असल्याचा दावा केला. नेमका हा वेडा काय म्हणतोय आणि काय करतोय, हेच कळत नाही. मिसाईल पडली की काही लोक लगेच प्यायला सुरू करतात, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
अहिल्यानगर-मनमाड रस्त्याचे काम रखडल्याच्या मुद्द्यावर बोलताना विखे पाटील यांनी त्यामागे जागतिक घडामोडींची साखळी असल्याचा दावा केला. इराणवरील हल्ल्यांमुळे क्रूड ऑइलच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.
क्रूड ऑइलशी संबंधित उत्पादन प्रक्रियेचा परिणाम पेट्रोलियम पदार्थांवर होतो आणि त्यातून मिळणाऱ्या बायप्रॉडक्टचा वापर रस्त्यांसाठी डांबर तयार करण्यासाठी केला जातो, असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यामुळे पुरवठा आणि उत्पादनावर परिणाम झाल्याने डांबराची उपलब्धता कमी झाल्याचा दावा त्यांनी केला. “हे सर्व काही डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीमुळे झाले आहे. ही सर्व लिंक आहे. ज्याला समजलं असेल, त्याला हे समजेल,” असेही विखे पाटील यांनी म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीपासून थेट अहिल्यानगर-मनमाड रस्त्याच्या रखडलेल्या कामापर्यंत आणि त्यानंतर दारू पिणाऱ्यांच्या वाढलेल्या प्रमाणापर्यंत जोडलेली ही मांडणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सुजय विखे पाटील यांच्या या रोखठोक आणि अजब दाव्यामुळे ते पुन्हा एकदा राज्यासह देशाच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.