Ahilyanagar District Bank Election 2026 : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी अजित पवार राष्ट्रवादीचे अकोले मतदारसंघातील आमदार डाॅ. किरण लहामटे यांना बिनविरोधासाठी साद घातली आहे. तुम्ही माझ्या एका शब्दाला मान दिलात, तर मीही तुमच्या दहा शब्दांना मान देईन, असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.
जिल्हा बँक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना आमदार लहामटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके एकत्र आले होते. एकमेकांची गळाभेट घेतली होती. या घडामोडीवरून तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला बळ मिळाले होते. परंतु विखे पाटलांच्या या प्रस्तावाला आमदार लहामटे कसा प्रतिसाद देतात, याकडे आता लक्ष लागले आहे.
विखे पाटील (Sujay Vikhe Patil) म्हणाले, "राजकारणात आरोप-प्रत्यारोप, मतभेद आणि निवडणुकीतील संघर्ष हा लोकशाहीचा भाग असला, तरी शेतकऱ्यांचे प्रश्न, पाण्याचे नियोजन आणि तालुक्याच्या विकासासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. राजकीय मतभेद असले, तरी आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण एक आहोत."
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या (DCC Bank) पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना विखे पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांना विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र येण्याचे आवाहन केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अकोले तालुक्यात येताना काहीशी काळजी वाटत होती, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अकोले तालुक्यातील विविध प्रवर्गांतून मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. राजकीय मतभेद असतानाही तालुक्याच्या प्रश्नांवर एकत्र काम करण्याची तयारी लोकप्रतिनिधींनी दाखवली, तर विकासाला अधिक गती मिळू शकते, असेही विखे पाटील यांनी म्हटले.
जिल्हा बँकेची निवडणूक असो किंवा अकोले तालुक्यातील पाणीप्रश्न, शेती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र काम करणे आवश्यक असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. शेतकरी अडचणीत असताना राजकीय मतभेदांपेक्षा त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. विकासाच्या मुद्द्यांवर संवाद साधून प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे त्यांनी सांगितले.
आमदार किरण लहामटे, भाजपचे माजी आमदार वैभवराव पिचड, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर, मधुकर नवले, कैलास वाकचौरे, शरद चौधरी, संजीवनी शिंदे, बाळासाहेब भोर, रावसाहेब वाकचौरे, विकासराव शेटे, चंदर बांडे यांनी जिल्हा बँकेसाठी अकोले मतदारसंघातून अर्ज दाखल केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.