Rahul Jagtap Vs Vikram Pachpute Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rahul Jagtap Vs Vikram Pachpute : बँकेच्या राजकारणासाठी मुख्यमंत्र्यांच्या 15 भेटी; शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी मात्र मौन? जगताप-पाचपुते यांच्यात जुंपली!

Rahul Jagtap questions Vikram Pachpute over 15 CM meetings as the Kukadi-Visapur water issue sparks a political clash in Shrigonda : श्रीगोंद्यातील कुकडी-विसापूर पाणीप्रश्नावर बेलवंडी फाट्यावर आंदोलन; ‘राजकीय भवितव्यासाठी आंदोलन’ म्हणत विक्रम पाचपुतेंनी आरोपांना दिले प्रत्युत्तर

Pradeep Pendhare

Shrigonda Political Clash : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी आमदार विक्रम पाचपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तब्बल 15 वेळा भेटी घेतल्या. मात्र, शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांची एकदाही भेट घेतली नाही का? असा सवाल राहुल जगताप यांनी केला.

लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नाबाबत उदासीन असल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, हे आंदोलन शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी होते की राजकीय भवितव्यासाठी, असा सवाल केला.

श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी आणि विसापूर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या (Farmer) पाणीप्रश्नासाठी शनिवारी (ता. 29) अहिल्यानगर-दौंड रस्त्यावरील बेलवंडी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विसापूर धरणातून सात गावांसाठी पाण्याचे आवर्तन सोडावे, विसापूर धरणात कुकडीचे पाणी सोडावे आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना कुकडी आवर्तनाचे पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या.

या आंदोलनात घनश्याम शेलार, टिळक भोस, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा, अनिल वीर, दिग्विजय नागवडे आणि जहीर जकाते सहभागी झाले होते. बेलवंडीचे सरपंच (Sarpanch) ऋषिकेश शेलार, लोणी व्यंकनाथच्या लोकनियुक्त सरपंच मनीषा नाहाटा, चिंभळेचे सरपंच संजय सावंत, घारगावचे माजी सरपंच रमेश खोमणे यांच्यासह विविध गावांचे सरपंच आणि लाभक्षेत्रातील शेतकरीही आंदोलनात सहभागी झाले.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि प्रशासनाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस उपविभागीय अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, तहसीलदार सचिन डोंगरे, पोलीस निरीक्षक सुभाष सानप, पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर आणि पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे आणि पाणीवाटपाबाबत प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. कुकडी आणि विसापूर लाभक्षेत्रातील गावांना पुरेसे पाणी मिळेपर्यंत या प्रश्नाचा पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

‘आंदोलन पाण्यासाठी की राजकीय भवितव्यासाठी?’

विरोधकांच्या आंदोलनावर भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. विसापूर तलावाच्या पाणीप्रश्नावर झालेल्या रास्ता रोको आंदोलनात शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा आपल्यावर टीका करण्यावरच विरोधकांचा भर होता, असा आरोप त्यांनी केला. ‘हे आंदोलन शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी होते की राजकीय भवितव्यासाठी?’ असा सवाल पाचपुते यांनी केला. यंदा जुलैमध्ये विसापूर तलावात केवळ 14 टक्के पाणीसाठा होता, असेही त्यांनी सांगितले.

आमदार पाचपुतेंचा दावा

जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे कुकडीचे अतिरिक्त पाणी मिळवून विसापूर तलाव भरता आला आणि त्याच आवर्तनात तलाव पुन्हा भरून घेण्यात आला, असा दावा पाचपुते यांनी केला. 5 ऑक्टोबर 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील जलसाठ्याचे 31 ऑगस्ट 2027 पर्यंत नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहितीही आमदार पाचपुते यांनी दिली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT