

India sugar production : चालू गाळप हंगामात देशातील निव्वळ साखर उत्पादन सुमारे 265 लाख टन राहण्याचा अंदाज असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 14 लाख टनांची घट होणार आहे.
इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधांमुळे साखरेचा रस किंवा मळी वळवली जाणार नसतानाही, एल-निनो आणि दुष्काळाचा फटका बसल्याने एकूण साखर उत्पादनात तब्बल 45 लाख टनांची मोठी तूट निर्माण झाली आहे.
गेल्या हंगामात देशात निव्वळ 279 लाख टन साखर उत्पादित झाली होती, तर 32 लाख टन साखर इथेनॉलसाठी वळवल्याने एकूण उत्पादन 311 लाख टनांवर पोहोचले होते. मात्र, देशांतर्गत बाजारात साखरेचे दर वाढल्याने केंद्र सरकारने (Central Government) इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली. त्यामुळे यंदा सर्व ऊस साखर उत्पादनासाठी वापरला जाणार असला, तरी एल-निनोमुळे उसाचे क्षेत्र घटल्याने उत्पादन 265 लाख टनांपर्यंतच मर्यादित राहणार आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या वर्षी 99 लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा त्यात सुमारे 10 टक्क्यांची (10 लाख टन) घट होऊन उत्पादन 90 लाख टनांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. उत्पादन घटणार असल्याने साखरेचे दर तेजीत राहतील. यामुळे गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात असलेल्या साखर कारखान्यांना काहीसा दिलासा मिळून त्यांचे मागील नुकसान भरून निघण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
फेब्रुवारीअखेर अंतिम लागवडीची आकडेवारी आल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल. उसाची उपलब्धता कमालीची घटल्याने आगामी गाळप हंगामात राज्यातील आणि देशातील साखर कारखान्यांना गाळपासाठी तीव्र टंचाई भासण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पावसाचा लहरीपणा आणि तीव्र दुष्काळामुळे राज्यातील ऊस लागवडीचे वेळापत्रक कोलमडले आहे. एकूण लागवडीच्या 10 टक्के (सुमारे 1.5 लाख हेक्टर) असणारी आडसाली लागवड यंदा अपुऱ्या पावसामुळे जवळपास झालेलीच नाही. एकूण लागवडीत 75 टक्के (सुमारे 7.5 लाख हेक्टर) वाटा असणारी पूर्वहंगामी लागवड यंदा केवळ 25 ते 30 टक्क्यांवर आली आहे. दुष्काळामुळे पिण्याचे पाणी आणि जनावरांचा चारा वाचवण्याला प्राधान्य दिले जात असल्याने उसाला पाणी मिळणे कठीण झाले आहे. परिणामी, जानेवारी-फेब्रुवारीतील 'सुरू' उसाच्या लागवडीवरही संकट ओढवले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.