Dr. Rahul Aher & Dr. Atmaram Kumbharde
Dr. Rahul Aher & Dr. Atmaram Kumbharde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik APMC Election News: नाशिकमध्ये भाजप मोजक्या समित्यांतच लढणार!

Sampat Devgire

Nashik News: जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांत (APMC) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) घटक पक्षांच्या नेत्यांनी आघाडी म्हणून या निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या मर्यादा लक्षात घेऊन भाजपने (BJP) मात्र मोजक्या बाजार समित्यांतच बळ आजमावण्याचे ठरविले आहे. (Nashik district apmc election takes serious political mode)

जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेल्यानंतर महाविकास आघाडी विरुद्ध अन्य सामना रंगणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यासह केंद्रात सत्ता असलेला भाजप या निवडणुकीत ठराविक बाजार समित्यांमध्येच आपले उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे दिसते आहे.

राज्यातील सत्ताबदलानंतर प्रथमच बाजार समित्यांच्या निवडणुका होत आहेत. शिवसेनेचे दोन गट तयार झाले असून, शिवसेना व उद्धव ठाकरे गट स्वतंत्रपणे रिंगणात असतील. महाविकास आघाडीने एकत्रित लढावे, अशा सूचना प्रदेश पातळीवरील नेत्यांनी दिल्या आहेत. त्याप्रमाणे काही तालुक्यांत महाविकास आघाडी म्हणून लढत असेल. परंतु तालुक्यांमधील वेगवेगळी राजकीय समीकरणे बघता कुठे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना होण्याची शक्यता आहे.

नाशिक बाजार समितीत महाविकास आघाडीने एकत्रित लढा देण्याची तयारी केली आहे. त्याविरोधात शिवसेना (शिंदे गट)-भाजपने एकत्र येत पॅनलनिर्मिती सुरू केली आहे. दिंडोरीत शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन पॅनल देणार असल्याच्या हालचाली आहेत. येथे मात्र, राष्ट्रवादी अंतर्गत वाद उफाळून आला आहे. त्या विरोधात शिंदे शिवसेना-भाजप पॅनल देऊ शकते.

कळवणमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होऊ शकतो. यात काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), शिंदे शिवसेना, भाजप काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. नांदगाव व मनमाड बाजार समितीत शिंदे शिवसेना भाजपला सोबत घेऊन पॅनल देणार हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे या दोन्ही बाजार समितीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

याच धर्तीवर मालेगावमध्ये लढाई होणार आहे. महाविकास आघाडी म्हणून लढण्याचे आदेश असले, तरी येवला, पिंपळगाव बसवंत, सिन्नर येथील बाजार समित्यांमध्ये थेट महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातच लढत होण्याची शक्यता अधिक आहे. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांकडून तयारी केली जात आहे. घोटी बाजार समितीत महाविकास आघाडी एक झाली आहे. त्या विरोधात शिंदे शिवसेनेने पॅनल उतरविण्याची तयारी केली आहे.

भुजबळ विरूद्ध इतर सगळे

महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीत पक्षीय राजकारण विरहित निवडणुका होण्याची शक्यता आहे. येथे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधातच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, भाजप जिल्हाध्यक्षा सुवर्णा जगताप, राष्ट्रवादीचे राजेंद्र डोखळे पॅनल उतरविण्याच्या तयारीत आहे.

चांदवड, देवळ्यात भाजपचे पॅनेल

चांदवड व देवळा बाजार समितीत वर्चस्व असलेल्या भाजपकडून पॅनेल बनविण्याच्या हालचाली सुरू आहेत. चांदवडमध्ये भाजपकडून शिंदे शिवसेनाच्या मदतीने स्वतंत्र पॅनल तयार होऊ शकतो. त्या विरोधात येथे महाविकास आघाडी एकत्र येऊन लढण्याची शक्यता आहे. देवळा बाजार समितीत भाजप स्वतंत्र पॅनल घेऊन उतरत आहे. त्याविरोधात सर्वपक्षीय एकत्र येण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT