Farooq Shaikh, MLA, AIMIM
Farooq Shaikh, MLA, AIMIM Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजपचे निम्मे नगरसेवक ठेकेदारीचे काम करतात?

Sampat Devgire

धुळे : पंतप्रधानांनी देशात स्वच्छ भारत मोहीम राबविली, धुळ्यात(Dhule) भाजपनेही (BJP) साफसफाई केली मात्र, ती महापालिकेच्या तिजोरीची केली. भाजपचे निम्मे नगरसेवक ठेकेदारीत गुंतले आहेत, असा आरोप शहराचे आमदार फारुक शाह (Farooq Shah) यांनी केला. धुळ्याच्या खासदारांनी गेल्या आठ वर्षात काय दिवे लावले असा सवालही त्यांनी केला.

आमदार श्री. शाह यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी विविध प्रश्‍नांवर भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की एकीकडे मी विकासकामे करीत असताना महापालिकेत मात्र सत्ताधारी भाजपने राजकारण करून विकासकामांना खीळ घातली. पांझरा नदी संवर्धनाचा प्रस्ताव मी मंत्र्यांकडे घेऊन गेलो. त्यांनी होकार दिला, त्यानंतर शासनाकडून मला पत्रही आले. मात्र, भाजपवाले खासदारांना श्रेय देण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. खासदारांनी गेल्या आठ वर्षांत काय दिवे लावले, हे त्यांना विचारले पाहिजे. केंद्रात मंत्री असताना जनतेसाठी काय केले, रेल्वेमार्गाचे काय झाले, त्यांचा ऑक्सिजन प्लांट सध्या कुठे आहे हे त्यांना विचारले पाहिजे. संसदेत पाच मिनिटे भाषण ठोकून स्वतःची पाठ थोपटून घेतली अशी टीका आमदार श्री. शाह यांनी केली.

त्यांनी अतिक्रमण केली

एखाद्या शहरात ५० टक्के जनता उर्दू भाषिक असेल तर त्यांच्यासाठी उर्दू घर बांधण्याचा शासनाचा निर्णय आहे. त्यानुसार मी प्रस्ताव पाठविला. शासनाने मान्यताही दिली. मात्र, महापालिकेच्या महासभेत सुपारी बहाद्दर नगरसेवकांनी हरकत घेतली. मालेगावमध्ये भाजपनेच उर्दू घर बांधले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसा निधी दिला, हे आता त्यांनाच विचारा. महापौर, खासदार आणि महासभेत जो नगरसेवक आवाज करत होता त्यांनी उर्दू भाषिकांच्या जागेवर अतिक्रमण करून घरे बांधली त्यांना उर्दू भाषिकांची जागा कशी चालते, असा सवालही आमदार श्री. शाह यांनी केला.

म्हणून त्यांचे पित्त खवळले

देवपूरसह शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. डांबरीकरण केलेले रस्ते दोन-तीन वर्षांत उखडतात. त्यामुळे मी काँक्रिट रस्ते करायचे ठरवले. त्यामुळे डांबराचे प्लांट असलेल्या ठेकेदारांचे पित्त खवळले. त्यातूनच मला विरोध झाल्याचे श्री. शाह म्हणाले.

काम करून दाखविले

कोरोना काळात मी घरात लपून बसलो नाही. त्या काळात मी लोकांना प्रत्यक्ष काम करून दाखविले. हिरे मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात व्हीडीआरएल प्रयोग शाळा स्थापित केली. शहरातील जनसमस्या सोडविण्याकडे माझे लक्ष आहे. माझ्या कार्यालयात सट्टाकिंग किंवा वाळूमाफिया नव्हे तर गोरगरीब येतात, रेशनच्या तक्रार करतात. त्यामुळेच मी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे जाऊन सहा हजार कुटुंबांसाठी रेशनचा कोटा वाढविला. २०० दिव्यांगांना पिवळे रेशनकार्ड मिळवून दिले. शेकडो दिव्यांगांना सायकलींचे वाटप केले. साक्री रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम महिनाभरात होईल असेही आमदार श्री. शाह म्हणाले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT