Radhakrishna Vikhe Balasaheb Thorat sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe On Balasaheb Thorat : पुत्राची खासदारकी धोक्यात; मंत्री विखे संतापून म्हणाले, 'बाळासाहेब थोरातांना शरम वाटली पाहिजे'

Radhakrishna Vikhe : भाजप उमेदवार खासदार सुजय विखे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांच्या मदतीला धावून गेलेले काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांविषयी प्रश्न विचारताच मंत्री राधाकृष्ण विखे यांनी थोरातांवर थेट हल्ला चढवला.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी खालच्या पातळीवर टीका केली. मंत्री विखे यांनी थोरातांवरच्या टीकेचा सूर आक्रमक होता. त्याचवेळी त्यात पुत्र खासदार सुजय विखे यांच्या विजयाविषयी काळजी देखील दिसत होती. 'बाळासाहेब थोरात यांना शरम वाटली पाहिजे', अशा शब्दात मंत्री विखे यांनी सुनावले.

भाजप (BJP) उमेदवार खासदार सुजय विखे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांच्या मदतीला धावून गेलेले काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांविषयी प्रश्न विचारताच मंत्री विखे यांनी थोरातांवर थेट हल्ला चढवला. 'थोरातांनी शरम बाळगली पाहिजे होती. स्वतःला काँग्रेसचे नेते समजतात. पण जिल्ह्यात एकही जागा काँग्रेस पक्षासाठी घेऊ शकले नाहीत. दुसऱ्याची तळी उचलण्यात धन्यता मानतात. याचून त्यांची वैचारीक दिवाळखोरी सिद्ध होते', असे खरमरीत भाषेत मंत्री विखे यांनी थोरात यांना सुनावले. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विखे-थोरात यांच्या राजकारणाने जिल्हा ढवळून निघणार, असे दिसते.

लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणमधील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांच्या प्रचारात काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी थेट सहभाग घेतला. बाळासाहेब थोरात यांनी त्यांची सर्व यंत्रणा नगर दक्षिणमध्ये नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी उतरवली होती. शरद पवार, संजय राऊत यांच्याबरोबरीने थोरात यांनी प्रचारसभा घेतल्या. नगर शहरात स्वतः गाठीभेट घेत चौक सभा घेतल्या. लोकसभा प्रचारावेळी थोरात यांनी विखे पिता-पुत्रावर जोरदार निशाणा साधला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्री विखे आणि थोरातांमध्ये चांगलेच राजकीय वाकयुद्ध रंगले होते. दोघे एकमेकांना 'काय व्हायचे ते होवून जाऊ द्या', असे बोलत आव्हान देत होते. थोरात यांच्या साथीला भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी देखील त्यांची यंत्रणा नगर दक्षिणेत नीलेश लंके यांच्या बाजूने कामाला लावली होती. त्यामुळे नगर दक्षिणेत उमेदवार विखे पिता-पुत्रविरुद्ध पवार, ठाकरे, थोरात, लंके, कोल्हे असा सामना रंगाला होता.

एक्झिट पोलचा अंदाजानंतर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार खासदार सुजय विखे पिछाडीवर दाखवले गेले. मंत्री विखे यांनी एक्झिट पोल फेटाळून सुजय विखे मोठ्या मताधिक्यांनी विजय होणार असल्याचा दावा केला आहे. हे करताना त्यांनी बाळासाहेब थोरात, भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे आणि नीलेश लंके या तिघांनी भविष्यातील अस्तित्वाची काळजी करावी, असा सूचक इशारा दिला आहे. तसेच बाहेरच्या मदतीने, उत्तरकडील मदतीने दक्षिणेत यश मिळेल, या भ्रामक कल्पना असल्याचेही मंत्री विखे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT