Maharashtra black magic : काळ्या जादूच्या प्रकारामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथल्या गोविंद पठारे यांच्या वस्तीवर हा प्रकार घडला आहे. काळी जादू करणाऱ्या चार व्यक्तींपैकी एकाला पकडल्यानंतर, तो पठारे कुटुंबियांचा जावई निघाला.
या प्रकरणी राहुरी (Rahuri) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अॅड. रंजना गवांदे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत, समुपदेशन केलं. जावायानेच सासऱ्याच्या घरासमोर हा प्रकार केल्यानं वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलं आहे.
जावयानेच सासऱ्याच्या घरासमोर लिंबू, हळदीकुंकू, काळी बाहुली टाकून पूजा केली. हा प्रकार 27 मार्चला रात्री एक वाजताच्या सुमारास गोविंद पठारे यांच्या घरासमोर सुरू होता. तीन ते चार व्यक्ती ही पूजा करत होते. पूजा करणाऱ्यांना पठारे यांच्या घरासमोरील गेट खोलून आत प्रवेश केला.
घराच्या उंबऱ्यावरच लिंबू, हळदीकुंकू, काळी बाहुली टाकून पूजा केली. घराबाहेर हालचाली सुरू असल्याची आतमध्ये असलेल्या पठारे कुटुंबीयांना जाग आली. त्यांनी दरवाजा उघडून पाहिल्यावर पूजेचा प्रकार समोर दिसला. त्याचवेळी पूजा करणाऱ्या व्यक्तींनी पसार झाले.
पठारे कुटुंबातील काही व्यक्तींनी पाठलाग करून एकाला पकडले. पकडलेल्याचा झाकलेला चेहरा उघड केल्यावर, तो त्यांचाच जावई निघाला. पठारे कुटुंबीयांनी त्याला पोलिसांच्या (Police) ताब्यात दिले. त्याच्यासोबत कुऱ्हाड, गलोल, नायलाॅन दोरी देखील होती.
जावयाच्या या प्रकाराने पठारे कुटुंब प्रचंड भयभीत होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अॅड. रंजना गवांदे यांनी पठारे कुटुंबियांची भेट घेतली. पठारे कुटुंबीयांनी 'अंनिस'च्या कार्यकर्त्यांसमोर आमच्या जिवीताला धोका आहे, असे सांगितले. या प्रकरणातील पसार झालेल्या इतर तिघांचा शोध होणे गरजेचे आहे.
लिंबू, नारळ, टाचण्या, पूजेने काही होत नसते, असे सांगून पठारे कुटुंबीयांची मनातली भीती अंनिसचे रंजना गवांदे, अशोक गवांदे आणि देविदास देसाई यांनी दूर केली. असे काही कुठं प्रकार सुरू असतील, तर 'अंनिस'च्या कार्यकर्त्यांनी त्याची माहिती देण्याचं आवाहन देखील करण्यात आलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.