Jalgaon News : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी आपले कट्टर राजकीय विरोधक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीत मोठा धक्का दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपने राजकीय खेळी करत आपल्या एकमेव संचालकाला सभापतीपदी बिनविरोध निवडून आणले. या घडामोडीमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, बाजार समितीची सत्ता खडसे गटाच्या हातातून गेल्याची चर्चा आहे.
१७ संचालक शरद पवार गटाचे, भाजपचा एकमेव संचालक
सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १७, तर भाजपचा एकमेव असे एकूण १८ संचालक निवडून आले होते. त्यावेळी एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली सुधीर तराळ यांची सभापतीपदी निवड झाली होती. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव सुधीर तराळ यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीत भाजपचे एकमेव संचालक जयपाल बोदडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची सभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेसाठी अध्यासी अधिकारी म्हणून जळगावचे सहायक निबंधक डी. व्ही. पाटील, एम. बी. गाढे आणि बाजार समितीचे सचिव विशाल चौधरी उपस्थित होते.
गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली भाजपची खेळी
अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही निवडणूक भाजपने आपल्या बाजूने वळवली. बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १७ संचालक असतानाही भाजपच्या जयपाल बोदडे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आणि स्थानिक नेत्यांच्या समन्वयातून बाजार समितीवर भाजपने आपला झेंडा फडकविल्याचे चित्र आहे. या राजकीय घडामोडीमुळे एकनाथ खडसे यांच्या गटाला धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणार : जयपाल बोदडे
सभापतीपदी निवड झाल्यानंतर जयपाल बोदडे यांनी गिरीश महाजन यांचे आभार मानले. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. “गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायापालट केला जाईल. शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे, बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि प्रशासनात पारदर्शकता आणणे, यालाच आमचे पहिले प्राधान्य असेल,” असे बोदडे यांनी सांगितले.
सत्कार समारंभाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
सभापतीपदी निवड झाल्यानंतर भाजपच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जितेंद्र पाटील, भाजपचे राज्य परिषद सदस्य तथा जिल्हा दूध संघाचे संचालक मधुकर राणे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल पाटील, तालुकाध्यक्ष अमोल देशमुख, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष मोहन महाजन, रावेर मंडळाचे तालुकाध्यक्ष दुर्गेश पाटील, उद्योजक गोपाल गंगतीरे, नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष आनंद पाटील आणि शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश माळी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.