

Eknath Khadse drone news : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी आपल्या मुक्ताईनगर येथील फार्म हाऊसवर २८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७.५० ते ८.१५ या वेळेत ड्रोनद्वारे रेकी आणि चित्रीकरण करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यांच्या वॉचमनने संबधित ड्रोनचे चित्रीकरण केलं होतं. त्यानंतर खडसेंनी पोलिसांकडे तक्रार करत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर पोलिसांनी या घटनेचा तपास करुन मोठा खुलासा केला आहे.
एकनाथ खडसे यांच्या फार्महाऊसवर फिरणारे ते ड्रोन नसून जळगाव विमानतळावरून बाळापूरच्या दिशेने अमरावतीकडे जाण्यासाठीचे प्रशिक्षण विमान असल्याचे विमान प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. पोलिस दलाने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून यासंदर्भात खुलासा केला आहे.
आमदार खडसेंच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिस दलाने याप्रकरणाची चौकशी केली. चित्रीकरण करण्यात आलेलं दृश्य नेमके ड्रोन होते की विमान होते, संबंधित वेळेत परिसरातून विमान गेले होते का? तसेच तक्रारीतील संशयाला कोणते पुरावे आहेत, याची खातर जमा पोलिसांतर्फे करण्यात आली.
खडसेंनी केलेल्या तक्रारीत नमूद असलेली वेळ आणि घटनेचे स्वरूप लक्षात घेता पोलिसांनी भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या जळगाव विमानतळ प्रशासनाशी तसेच संबंधित विमान प्रशिक्षण संस्थांशी पत्रव्यवहार करत संपर्क साधला.
नमुद चित्रीकरणाच्या चौकशीत जळगाव विमानतळाचे निर्देशक हर्षकुमार त्रिपाठी, मुख्य सुरक्षा अधिकारी हेमंत गौतम, एअरक्राफ्ट फिट-टू-फ्लायचे व्यवस्थापक महेंद्रकुमार सिंह आणि संबंधित विमानतळ अधिकाऱ्यांशी पोलिसांनी चर्चा केली.
खडसे यांनी उपलब्ध करून दिलेला चित्रीकरणाचा व्हिडिओ देखील संबंधित अधिकाऱ्यांना दाखविण्यात आला. व्हिडिओतील दृश्यांचे निरीक्षण केल्यानंतर ते दृश्य ड्रोनचे नसून जळगाव विमानतळावरून उड्डाण केलेल्या प्रशिक्षण विमानाचे असल्याचा खुलासा संबंधित अधिकाऱ्यांनी केला. जळगाव विमानतळावर दोन विमान उड्डाण प्रशिक्षण संस्था (फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन्स) कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत बाळापूर आणि अमरावती परिसराच्या दिशेने नियमित प्रशिक्षण उड्डाणे केली जात असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
त्यानंतर पोलिसांनी केवळ विमानतळ प्रशासनाच्या माहितीवर अवलंबून न राहता स्वत:ही चौकशी केली. पोलिसांनी विमानांच्या हालचालींची माहिती देणाऱ्या प्लेन फाइंडर ॲपवरील उपलब्ध नोंदी तपासल्या. या नोंदींच्या पडताळणीत संबंधित वेळेच्या सुमारास त्या परिसरातून विमान जात असल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारीत नमूद करण्यात आलेली तारीख व वेळ, विमानतळ प्रशासनाचे अभिलेख, आदींच्या आधारे ते, ड्रोन नसून प्रशिक्षणार्थी विमानाचे उड्डाण असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.