धुळे : कोरोना (Covid19) लसीकरण मोहिमेत घरोघरी तपासणीवेळी लसीकरण प्रमाणपत्र तपासले. त्यात मालेगाव (Malegaon) महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यांना ते बनावट आढळले. त्यांनी तसा पत्रव्यवहार धुळे (Dhule) महापालिकेशी केला. त्यावर कारवाई एैवजी धुळे महापालिकेने भलत्याच विषयावर पत्रव्यावहार केला. त्यामुळे या प्रकरणात उलटा चोर कोतवाल से पूछे, असा सूर वर्तुळात उमटत आहे.
येथील महापालिकेने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ३ हजार ११९ व्यक्तींना लसीकरण झालेले नसतानाही त्यांचे बनावट लसीकरण प्रमाणपत्र जनरेट करून आर्थिक फायद्यासाठी वितरित करून शासन व प्रशासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी स्थायी समिती सभेत तक्रार झाली तेव्हा आयुक्तांनी चौकशी समिती स्थापन करत उपायुक्त गणेश गिरी यांना समितीचे अध्यक्ष केले. त्यांच्या अहवालात फार काही निष्पन्न झाले नाही.
वास्तविक, येथील महापालिका क्षेत्रात पहिल्या डोसची नोंदणी न करता थेट दुसरा डोस दाखवून बनावट लसीकरण प्रमाणपत्र वितरित झाल्याचा गैरप्रकार समोर आला आहे. यात महापालिकेच्या फिर्यादीनुसार काही बनावट लसीकरण झालेल्या नागरिकांची नावेही प्रशासकीय चौकशीत ऑनलाइन प्राप्त केलेली आहेत. याचा अर्थ महापालिकेला बनावट लसीकरण प्रमाणपत्र कसे वितरित झाले याचा बऱ्यापैकी छडा लागला, असे दिसते. त्यात मालेगाव येथे झालेल्या तपासणीत तेथील अनेक नागरिकांकडे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र धुळ्यातून प्राप्त झाल्याचे दिसून आले.
त्यानुसार मालेगावच्या आरोग्याधिकाऱ्यांनी लशीच्या बाटलीवरील एकाच बॅचचा नंबर दोन्ही डोसच्या प्रमाणपत्रावर नोंदलेला असल्याचे पत्र पाठवून येथील बनावट लसीकरण प्रमाणपत्राच्या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब केला. कारण पहिला व दुसऱ्या डोसमध्ये लशीप्रमाणे किमान सरासरी २८ ते ८४ दिवसापर्यंत अंतर होते. त्यामुळे बॅचनंबर सारखे येऊच शकत नाहीत. असे असताना मालेगाव आरोग्याधिकाऱ्यांनी नेमक्या याच मुद्यावर बोट ठेवले. त्यात चूक कबूल करण्याऐवजी येथील आरोग्य विभागाने मालेगाव महापालिकेला पत्र देताना पहिला व दुसऱ्या डोसचे प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास ते सविस्तर माहितीसह चौकशीसाठी द्यावे, अशी मागणी करून आम्ही त्यातील नव्हेच, असे दर्शविण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.