Dhule corporation meeting
Dhule corporation meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shocking: कोरोना लसीकरणासाठी रुग्णालय कशाला? झेरॉक्स सेंटरमध्ये या!

Sampat Devgire

धुळे : कोरोना (Covid19) प्रतिबंधात्मक लसीकरणाची रोजची स्थिती केंद्र शासनाच्या विशिष्ट वेबसाइट/पोर्टलवर नोंदणे स्थानिक स्वराज्य संस्था, संबंधित सर्व सरकारी (Dhule) व वैद्यकीय यंत्रणांना बंधनकारक आहे. त्यासाठी जिल्ह्यात फक्त तीन जणांना त्या वेबसाइट/पोर्टलचा सिक्रेट पासवर्ड दिला गेला. तो महापालिकेतून (Dhule) लीक झालाच कसा आणि त्याचे कनेक्शन शहरातील एका झेरॉक्स सेंटरपर्यंत गेले होते किंवा कसे याबाबत सखोल तपासाची गरज व्यक्त होत आहे.

केंद्र सरकारने सिक्रेट पासवर्ड जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी, महापालिकेचे आरोग्याधिकारी, तसेच संबंधित सॉफ्टवेअरचे संबंधित व्यवस्थापक या तीन जणांनाच वितरित केला. मात्र, ठिकठिकाणी लसीकरण केंद्र खुले करावे लागल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी सिक्रेट पासवर्ड हा त्या-त्या केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांना वाटप केला. त्यात काही सरकारी कर्मचारी, तर काही मानधन तत्त्वावरील कंत्राटी कर्मचारी होते. ते विश्‍वासू आणि शासनाप्रती कर्तव्य, निष्ठा बाळगणारे होते किंवा कसे हे तपासणे आरोग्याधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.

सखोल तपासाचा भाग

असे असताना सिक्रेट पासवर्ड शहरातील एका दाट वस्तीतील झेरॉक्स सेंटरपर्यंत पोचला आणि तेथूनही डोस घेतलेले नसताना थेट काही बनावट लसीकरण प्रमाणपत्राचे वितरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच एसव्हीके सेंटरवर एकाच दिवशी अडीच हजारांवर लसीकरणाचे प्रमाणपत्र वितरित झाल्याने आर्थिक घोटाळ्याचा संशय अधिक बळावला. सरासरी हजार रुपये प्रमाणे सुमारे आठ ते दहा हजार बनावट प्रमाणपत्रे वितरित झाल्याचा संशय महापालिकेच्या सदस्यांकडून व्यक्त झाला आहे.

एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्राचे वितरण, शिवाय डोससाठी वापरात न आलेल्या शेकडो बाटल्यांचा हिशेब अद्याप मनपाकडून जाहीर झाला नसल्याने सुमारे दोन कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तत्पूर्वी, भाजपच्या जागृत सदस्याने हा घोटाळ आठ ते दहा कोटींपर्यंत असू शकतो, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली आहे. एकूण या प्रकरणाचा वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हा दाखल झाल्यास पोलिसांना सखोल तपास करावा लागेल.

तांत्रिक बाबीतून भांडाफोड...

बोगस लसीकरण प्रमाणपत्रांच्या या विषयात अनेक तांत्रिक बाबींचाही समावेश आहे. त्यामुळे या तांत्रिक बाबीच या प्रकरणाचा भांडाफोड करतील, पर्यायाने ज्यांचे हात यात गुंतले आहेत तेही समोर येतील, असा एक तर्क आहे. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांसह सायबर तपासातूनही हाताळले जाण्याची गरज व्यक्त होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT