Vijay Karanjkar and Saroj Ahire Clash Borkhind Interchange Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Borkhind Interchange News : 343 कोटींच्या इंटरचेंजवरून श्रेयवादाची ठिणगी; सरोज आहिरे की विजय करंजकर?

Saroj Ahire and Vijay Karanjkar Clash Over Credit : नाशिकजवळील बोरखिंड ता. सिन्नर येथे समृद्धी महामार्ग इंटरचेंजला मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात ३४३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.

Ganesh Sonawane

Nashik Borkhind Interchange : नाशिक जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या बोरखिंड (ता. सिन्नर) येथील समृद्धी महामार्ग इंटरचेंजच्या कामाला १० सप्टेंबर रोजी शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली.

या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात ३४३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा निधी मंजूर करण्यात आला असून, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या खात्याचे मंत्री आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या इंटरचेंजचे महत्त्व वाढले आहे.

दरम्यान, 343 कोटींच्या इंटरचेंजला मंजुरी मिळाल्यानंतर आता त्यावरुन राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे व शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. दोघांकडूनही आपल्या प्रयत्नातून व सातत्यपूर्ण पाठपुरव्यातून या इंटरचेंजला मंजुरी मिळाल्याचे दाखवले जात आहे. शिवसेना व राष्ट्रवादी अशा दोन्ही गटाकडून या कामाचे श्रेय घेण्यासाठी बॅनरबाजी सुरु आहे.

एकीकडे, आगामी सिंहस्थ कुंभमेळा विचारात घेऊन विजय करंजकर यांनी ११ मार्च २०२६ रोजी शासनाकडे या इंटरचेंजला मंजुरी मिळावी यासाठी मागणी केली होती असे सांगितले जात आहे. त्यानुसार राज्याच्या रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्षांना सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी २४ एप्रिल रोजी करंजकर यांच्या मागणीनुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.

तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने २७ एप्रिल रोजी रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना स्पष्ट आदेश देत करंजकर यांच्या मागणीनुसार कार्यवाही करण्याचे सूचित करुन तसा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार संबधित विभागाने इंटरचेंजच्या कामाला मंजुरी देत ३४३ कोटींचा निधी मंजूर केल्याचा दावा करंजकर समर्थकांनी केला आहे.

दुसरीकडे देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी सिंहस्थ- कुंभमेळ्याच्या अनेक बैठका व भेटींमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे नाशिक रोड- देवळाली कॅम्प- भगूर- पांढुर्लीमार्गे समृद्धी महामार्गाला जोडणी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ३४३ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचे सांगितले आहे.

शासकीय पुरावा म्हणून दोन्ही गटाकडून संबधित विभागाकडे केलेला पत्रव्यवहार देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. आमदार सरोज अहिरे यांनी देखील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांसाठी समृद्धी महामार्गाला बोरखिंड येथे विशेष बाब म्हणून इंटरजेंच देण्याबाबत १२ मार्च २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागणीचा पत्रव्यवहार सोशल मीडियावर शेअर केला आहे. एकंदरीतच काय तर आमदार आहिरे व उपनेते करंजकर दोघांमध्ये या इंटरचेंजच्या मंजुरीवरुन श्रेय वादाची लढाई रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT