Dhannajy Munde

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

पासपोर्टच्या धर्तीवर होणार जात प्रमाणपत्रांची ऑनलाइन पडताळणी

धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.

Sampat Devgire

नाशिक : पासपोर्टच्या धर्तीवर जात प्रमाणपत्र पडताळणी करून मिळण्यासाठी ही प्रक्रियासुद्धा ऑनलाइन केली जावी, यात असलेल्या सर्व त्रुटी दूर करून पासपोर्टच्या धर्तीवर सुटसुटीत व अद्ययावत प्रणाली तातडीने विकसित करून कार्यान्वित केली जावी, असे निर्देश धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी मंगळवारी सामाजिक न्याय विभागाच्या झालेल्या बैठकीत दिले.

श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी, बार्टीचे महासंचालक डॉ. धम्मज्योती गजभिये, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे उपस्थित होते. बैठकीत जात प्रमाणपत्र पडताळणी विषयीच्या तक्रारींवर चर्चा झाली. ‘सकाळ’मध्ये याविषयी वृत्त प्रसिद्ध झाले होते. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये ४२ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात; परंतु त्यांना प्रवेशासाठी अर्ज करायला थेट जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जावे लागते. त्याचप्रमाणे वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या स्वाधार शिष्यवृत्तीची अर्ज व छाननी आदी प्रक्रियादेखील ऑफलाइन आहे.

परदेश शिष्यवृत्तीसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिष्यवृत्ती योजनेची निवडप्रक्रिया ऑफलाइन असणे भूषणावह नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जावी, यासाठी कार्यपद्धती निश्चित करून एक महिन्याच्या आत ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित केली जावी, असे धनंजय मुंडे म्हणाले. सीईटी प्रवेश व आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया पासपोर्टच्या धर्तीवर ऑनलाइन केली जावी, या प्रक्रियेमध्ये त्रुटी येणे किंवा विलंब होणे पूर्णपणे टाळून पारदर्शक पद्धतीने काम केले जावे. ही प्रक्रिया एक महिन्याच्या आत कार्यान्वित केली जावी, असे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले.

जुन्या शासकीय निवासी शाळांची ठिकाणे वगळून अन्य तालुक्यांमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या निवासी शाळांबाबत शासकीय जागा उपलब्धीचा मार्ग मोकळा असल्यास तसे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना धनंजय मुंडे यांनी यासंबंधी झालेल्या बैठकीत दिल्या. तसेच राज्यस्तरीय केंद्रपुरस्कृत योजनांसाठी अर्ज केलेल्या स्वयंसेवी संस्थांचे प्रस्ताव अंतिम करून केंद्र शासनास शिफारशीसह पाठविण्याचे निर्देशही आज झालेल्या बैठकीत त्यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT