Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal on Manoj Jarange : 'तुमच्या भूमिकेला राजकीय वास'; छगन भुजबळांचे मनोज जरांगेंना सडेतोड उत्तर

Sunil Balasaheb Dhumal

Nashik Political News : मराठा समाजातील सरसकट लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला राज्यभरातील ओबीसी समाजाने आक्षेप घेतला. सरसकट लोकांना आरक्षण देऊ नका, अशी भूमिका घेत ओबीसींनी आंदोलन छेडले. यावर सरकारनेही कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी काळजी घेऊन मराठा आरक्षण देऊ, असे जाहीर केले. यानंतर मनोज जरांगे पाटलांनी मात्र ओबीसी नेत्यांवर सडकून टीका केली. मंत्री छगन भुजबळांचा एकेरी उल्लेख करत मराठ्यांनी तुम्हाला मोठे केले, त्याची परतफेड करण्याची वेळ आल्याची आठवण करून दिली. (Latest Political News)

जरांगे पाटलांनी केलेल्या टीकेला छगन भुजबळांनी सडेतोड उत्तर दिले आहे. राज्यातील काेणा एकालाच लक्ष कराल तर तुमच्या भूमिकेला राजकीय वास येईल, असे म्हणत भुजबळांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला. Chhagan Bhujbal भुजबळ म्हणाले, 'मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी माझा विरोध नाहीच. ओबीसी समाजाला आरक्षण खूप कमी आहे. त्यामुळे मराठ्यांना वेगळे आरक्षण द्यावे, हीच भूमिका आहे. हे मत एकट्याचे नाही इतर अनेक नेत्यांचेही आहे. त्यांचे नाव घेऊन जरांगे का बोलत नाहीत? मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा सगळ्यांना बोला, नाहीतर त्याला राजकीय वास येईल,' असा सूचक सल्ला भुजबळांनी जरांगेंना दिला आहे.

काय म्हणाले होते जरांगे पाटील?

'गेल्या ७५ वर्षांपासून मराठा समाजाने ओबीसी नेत्यांची प्रतिष्ठा, मान, इज्जत वाढवली. आम्ही मराठ्यांनी तुमच्यावर उपकार केले. आमच्या बापजाद्यांनी तुमची प्रतिष्ठा वाढवली. आता उपकाराची परतफेड करण्याची वेळ आली. आरक्षण द्या आणि उपकाराची परतफेड करा. आमचा बदला घेऊ नका,' असे म्हणत (Manoj Jarange) मनोज जरांगे पाटलांनी मंत्री छगन भुजबळांना सुनावले. 'भुजबळांनाही मराठ्यांनी मदत केली. आता आमच्यावर वेळ आली आहे म्हणून विरोध करू नका. तुम्ही आरक्षणासाठी सहकार्य करा, मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेईल,' असेही जरांगे पाटील म्हणाले होते.

मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख केला होता. यानंतर नांदेडमध्ये ते म्हणाले, आता मी तुम्हाला माननीय बोलतो. आवाहन करतो माननीय भुजबळ साहेब आरक्षण द्या. भुजबळ आणि त्यांना पाठबळ देणाऱ्यांसमोर मी नाक घासायला तयार आहे. पण आमच्याकडे बारकाईने बघा आणि आरक्षण द्या,' असं जरांगे पाटील म्हणाले. 'ओबीसी बांधव आणि आमचे संबंध गावपातळीवर खूप चांगले आहेत. त्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका,' असे आवाहनही जरांगेंनी केले होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT