Chhagan Bhujbal & Amit Shah Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळांच्या मतदारसंघात भाजपच्या गुजरात निवडणूक टीमने ठोकला तळ, हे आहे कारण...

Chhagan Bhujbal; BJP's Gujarat team doing serious efforts in Bhujbal's constituency-भारतीय जनता पक्ष करतोय स्वतंत्र यंत्रणेमार्फत विधानसभेसाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा उभारण्यासाठी सुरू आहे काम.

Sampat Devgire

BJP Politics News: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. ही निवडणूक जिंकणे भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत प्रतिष्ठेचे आहे. महाराष्ट्रात पराभव झाल्यास त्याचा शेजारच्या गुजरात राज्यावर परिणाम होऊ शकतो, ही भाजपची भिती आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा आत्मविश्वास आणि यंत्रणेची चाचपणी केली. त्यांनी भाजपकडून महाराष्ट्रासाठी स्वतंत्र फॉर्मुला असल्याचे सूचक वक्तव्य केले होते.

या संदर्भात पक्षाचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांमध्ये आत्मविश्वास कमी झाल्याचे त्यांचे निरीक्षण होते. त्याबाबत ते उघडपणे बोलले. त्याची प्रचिती आता येऊ लागली आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातच भाजपच्या गुजरातच्या टीमने सध्या तळ ठोकला आहे. पराक्रमसिंग जडेजा हे शहा यांच्या विश्वासातील नेते गेली दोन महिने येवल्याचा बारीक-सारीक तपशील जमा करीत आहेत. संघ परिवाराच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या घरी जाऊन ते एक वेगळा संदेश देत आहेत.

यानिमित्ताने भाजपच्या संघटनात्मक पदाधिकाऱ्यांना नक्की काय काम करायचे, याची माहिती दिली जात आहे. हे पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा करून मतदारसंघ कुणालाही सुटला तरी महायुतीचाच उमेदवार विजयी झाला पाहिजे, असे सांगत आहेत, असा दावा भाजप येवला तालुकाप्रमुख नाना लहरे यांनी केला.

भाजपकडून गेले वर्षभर येवला मतदार संघात निवडणुकीची तयारी सुरू आहे. अमृता पवार या विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयक आहेत. त्या स्वतः भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांनी सबंध मतदार संघात सातत्याने संपर्क ठेवून विविध कामे केली आहेत.

मंत्री भुजबळ यांच्या अनुयायांनी देखील अमृता पवार यांचा धसका घेतला आहे. भाजपच्या गुजरात टीमचे प्रमुख जडेजा यांनी आतापर्यंत अंदरसुल, येवला, मुखेड, पाटोदा, लासलगाव या जिल्हा परिषद गटांमध्ये बूथ प्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांची बैठका घेतल्या. निवडणूक यंत्रणा उभी केली आहे.

पक्षाचे प्रमोद रासकर, आनंद शिंदे, बाबा डमाळे, मनोज दिवटे, नानासाहेब लहरे, राजू परदेशी, गोविंदराव घोरपडे आदी विविध कार्यकर्ते गुजरातहून आलेल्या पदाधिकाऱ्यांशी मन्वय ठेवून आहेत.

आता निवडणूक दोन महिन्यांवर आली आहे. मंत्री भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आहेत. या पक्षाकडून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. हा पक्ष महायुतीचा प्रमुख घटक आहे. असे असताना भाजपने मंत्री भुजबळ यांच्या मतदारसंघात निवडणुकीची तयारी केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT