Chhagan Bhujbal News: आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आणि कांद्याच्या राजकारणाचे देशातील केंद्र असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या सभापतींची निवडणूक आज झाली. या निवडणुकीकडे सबंध जिल्ह्याच्या राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते. सहा महिन्यांच्या खंडानंतर ही निवडणूक झाली.
आज सकाळी बाजार समितीच्या सभागृहात संचालक मंडळाची बैठक झाली. यावेळी सर्व संचावक उपस्थित होते. सभापतीपदासाठी भाजपचे नेते डी. के. उर्फ नाना जगताप यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतीपदी ललित दरेकर यांचीही बिनविरोध निवड झाली.
सभापतींच्या नावाबाबत गेले काही दिवस मोठा ससपेन्स होता. गुरूवारी रात्री माजी मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत संचालकांना निरोप दिला होता. त्यानुसार ही निवडणूक झाली. सध्या बाजार समितीत माजी छगन भुजबळ आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांचा गट सत्तेत आहे. या दोन्ही गटांनी सभापती आणि उपसभापती पद रोटेशननुसार आपल्या गटाकडे ठेवण्याचे सुत्र स्विकारले आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज झाली. मात्र, निवडणूक झाल्यानंतरही नवनिर्वाचित सभापती, उपसभापती यांच्या निवडीवर टांगती तलवार कायम असणार आहे. कारण या प्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणी येत्या १५ एप्रिलला आहे.
त्यात याचिकाकर्त्याच्या बाजुने निकाल लागल्यास सभापती व उपसभापतीची निवडणूक रद्द होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत व्यापारी व आडते गटातील ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी निवडणुकीस आक्षेप घेतल्याने गेली चार महिने निवडणूक लांबणीवर पडली होती. या वादात लासलगाव बाजार समितीच्या संचालकांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने निवडणुकीला परवानगी दिली होती. याचिकाकर्ते ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी गेल्या सोमवारी (दि. ७) म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितल्याने न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली होती. मात्र, सभापती, उपसभापती यांची निवडणूक न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन असणार आहे.
काय होता वाद...
सटाणा बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापाऱ्यांना व अडत्यांना दोन मते देण्यात आली, पण लासलगावमध्ये त्याला नकार दिला गेला. हाच मुद्दा याचिकाकर्ते गांगुर्डे यांनी उपस्थित केला आहे. एकाच जिल्ह्यातील दोन संस्थांना वेगवेगळा न्याय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबतची कागदपत्रे सादर करण्यासाठी गांगुर्डे यांनी न्यायालयात वेळ मागितला आहे.
-----
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.