Chhagan Bhujbal, Devendra Fadnavis, Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela : भुजबळांनी बैठक गाजवली, आता मुख्यमंत्री फडणवीस घेणार कुंभ आखाड्यात उडी

Devendra Fadnavis Nashik : कुंभमेळामंत्री म्हणून गिरीश महाजन काम पाहत असतानाचा मंत्री छगन भुजबळांनी आढावा बैठक घेऊन महाजनांना शह दिला होता. आता भाजप वेगळी चाल खेळून थेट मुख्यमंत्रीच आखाड्यात उतरतील.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे भरणारा कुंभमेळा जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतशी कुंभमेळ्याच्या नियोजनावरून सत्ताधाऱ्यांमध्ये सुरु असलेली धुसफूस समोर येऊ लागली आहे. कुंभमेळामंत्री म्हणून गिरीश महाजन काम पाहत असून महाजन हे जाणीवपूर्वक सत्ताधारी आमदारांसह जिल्ह्यातील मंत्र्यांना दूर ठेवत असल्याचे आरोप झाले. त्यातून महाजन यांना शह देण्यासाठी मागे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी कुंभमेळा नियोजनाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. त्यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. स्थानिक मंत्री म्हणून मला कुंभमेळ्याचा आढावा घेण्याचा अधिकार असल्याचं भुजबळांनी म्हटलं होतं. त्यांनी अधिकाऱ्यांनाही चांगल्याच कानपिचक्या दिल्या होत्या.

सत्ताधाऱ्यांमध्ये कुंभमेळा नियोजनावरुन मानपमानाचा अंक रंगत असताना आता याच कुंभ आखाड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उतरणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे पुढच्या पंधरा दिवसांत नाशिकमध्ये आढावा बैठक घेणार आहे. त्यामुळे जिल्हाप्रशासन कामाला लागले असून कुंभमेळा संबंधित कामांच्या फायली तत्काळ मार्गी लावण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

राज्याचा महसूल विभाग सेवा पंधरवडा साजरा करीत असून या उपक्रमाचा राज्यस्तरीय समारोप नाशिकमध्ये घेण्याचे नियोजन केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. याच दौऱ्यात मुख्यमंत्री सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेणार असून तसे निश्चित झाल्याचे समजते आहे. तुर्तास बैठकीची तारीख व वेळ निश्चित नसली तरी यंत्रणा त्यादृष्टीने तयारीत आहे.

भाजप जाणीपूर्वक कुंभमेळ्याच्या नियोजन व तयारीपासून आपल्याला दूर ठेवत असल्याची सल महायुतीचे घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) व शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला लागून राहिली आहे. त्याचमुळे मंत्री भुजबळांनी बैठक घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही आढावा बैठक घेणार असल्याचं मंत्री दादा भुसेंनी जाहीर केलं होतं. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांतील मतभेद उघड झालेले असतानाच मुख्यमंत्री स्वतः नाशिकमध्ये येऊन बैठक घेणार आहेत.

दरम्यान कुंभमेळा नियोजनात सहभागी करुन घेतलं जात नाही यावरुन तेराही आखाडे व साधू-महंतांमध्येही नाराजीचा सूरू आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीही नाशिकमध्ये साधू-महंतांशी चर्चा केली होती. तसेच त्यासंदर्भात अलिकडे जिल्हाधिकाऱ्यांनीही साधू-महंतांची भेट घेतली व चर्चा केली. नियोजनात सहभागी करून घेतानाच सूचनांची पूर्तता केली जावी अशी साधू-महंतांची इच्छा आहे. परंतु उपेक्षा कायम असल्याने साधू-महंत नाराज आहेत. त्यामुळे नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्री पुन्हा एकदा साधू-महंतांशी संवाद साधत त्यांची नाराजी दूर करणार का हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT