Chhagan Bhujbal : विधानसभेला प्रचंड बहुमत मिळवून महायुतीने राज्यात पुन्हा सत्ता स्थापन केली. मात्र महायुतीच्या मंत्रिमंळात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं. त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज होते. वेळोवेळी त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. अजित पवार यांच्यावर देखील त्यांनी अनेकदा टीका केली. मात्र भुजबळांच्या नाराजीची पक्षनेतृत्वाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही.
मंत्रिमंडळात आपल्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याच्या भावनेने भुजबळ अजित पवार यांच्यापासून काहीसे दूरावले होते. जहाँ नही चैना, वहा नही रहना असं म्हणत त्यांनी पक्ष सोडण्याचा इशाराही दिला. पण अजित पवार यांच्यावर या सगळ्यांचा काहीही परिणाम झाला नाही. मग अचानक असं काय झालं आणि भुजबळ मंत्री झाले? अजित पवारांच्या मनात नसतानाही भुजबळांनी ही किमया कशी केली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा राजभवनातून जरी झाली असली तरी भुजबळांना मंत्रिपद दिलं जाणार यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादी पक्षाकडून न येता ती भाजप या पक्षातून दिली गेली. त्यामुळे भुजबळांची वर्णी लागणं ही भाजपची इच्छा होती असं स्पष्ट झालं आहे. छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत. भाजपचे राजकारण कायम ओबीसी केंद्रित राहिले आहे. त्यामुळे भुजबळांसारखा ओबीसींचा मोठा चेहरा सोबत असावा अशी भूमिका सुरुवातीपासून भाजपची होती. त्यामुळे भुजबळांनी देखील तीच संधी हेरली व या काळात भाजपसोबत जवळीक साधली.
धनंजय मुंडे हे देखील ओबीसी नेते आहेत. मात्र ते आता संतोष देशमुख हत्याप्रकरणात अडकले आहेत. त्यामुळे त्यांना राजीनामा देखील द्यावा लागला आहे. अशात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. यामुळे मुंडे यांच्या जागी ओबीसी नेता म्हणून भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
छगन भुजबळ यांनी सर्वप्रथम या सर्व काळात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची जवळीक वाढवली. भुजबळ यांनी डिसेंबरमधील अधिवेशन संपल्यानंतर सागर बंगल्यावर फडणवीस यांची भेट घेतली होती. ना की अजित पवार यांची. आताही जेव्हा फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेले तेव्हाही भुजबळ यांनी त्यांची भेट घेतली होती. या काळात अजित पवार यांनी त्यांची समजूत काढण्याचा फारसा प्रयत्न केला नाही.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाच विश्वासात घेत भुजबळांनी मंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतल्याचे सांगितले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना जवळ करत भुजबळांनी मंत्रिपदाची सेटींग लावली. त्यामुळे अजित पवार यांनी डावललं असलं तरी देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना सावरलं असं म्हणता येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.