Chhagan Bhujbal, PDS Minister Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Politics: भुजबळांच्या जिल्ह्यातच धान्य वितरण ठप्प, दुकानदार झाले आक्रमक

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News: गरजू आणि गरीब नागरिकांना राज्य शासनातर्फे धन्य वितरण केले जाते. शिधापत्रिका धारकांना होणाऱ्या या पुरवठ्यात सातत्याने अडथळे येत आहेत. त्यामुळे सिन्नर येथील संतापलेले दुकानदार आंदोलनाच्या तयारीत आहेत.

राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या साखळी सातत्याने अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका दारिद्रय रेषेखालील आणि आदिवासी नागरिकांना बसत आहेत. प्रतीक्षा करूनही सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील दुकानांतून त्यांना धान्य मिळत नाही.

या संदर्भात संगणकीय यंत्रणेचा वापर केला जातो. या यंत्रणेतील ई पॉस मशीन नेटवर्क बाधित होत असल्याने काम करीत नाही. त्यामुळे खुद्द या खात्याचे मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यातच सार्वजनिक वितरण व्यवस्थापन झाली आहे.

मोठा गाजावाजा करून वितरित करण्यात आलेल्या 'फोर जी' यंत्रे आणि त्यांचे सर्व्हर बंद पडत आहेत. या त्रासाला कंटाळून धान्य वितरण दुकानदार ही यंत्रे राज्य शासनाला परत करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. गेल्या दोन दिवसात पुरवठा विभागाला अनेक धान्य दुकानदारांनी ई पॉस यंत्रे परत करण्याचा इशारा दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातच हे घडत असल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या बायोमेट्रिक पद्धतीने अंगठ्याचा ठसा उमटवून तो मॅच झाल्यावर धान्य पुरवठा केला जातो. हे काम होत नसल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गरीब आणि गरजू नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. यापूर्वी असलेल्या थ्रीजी यंत्रणेचाही हाच त्रास होता. सध्या दुकानदारांना वारंवार पुरवठा विभागाकडे चकरा माराव्या लागत आहेत. कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याची तक्रार स्वस्त धान्य दुकानदारांनी केली आहे.

या अडचणींच्या विरोधात सिन्नर तालुक्यात अनेक दुकानदारांनी आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. या गोंधळाकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे. सर्व्हर डाऊन असल्याने अनेक शासकीय यंत्रणा व त्यांच्या योजना अडचणीत आहेत. त्यात या नव्या समस्येची भर पडली आहे.

याबाबत सिन्नरचे नायब तहसीलदार सागर मुंदडा आणि पुरवठा अधिकारी विशाल धुमाळ यांना निवेदन देण्यात आले आहे. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष सतीश भुतडा, दीपक जगताप, भगवान जाधव, कल्पना रेवगडे, नवनाथ गडाख, संजय झगडे, राजू गोळेसर, अण्णा जाधव यांचा विविध दुकानदार यावेळी उपस्थित होते.

शासनाने घेतली दखल

तक्रारी वाढल्याने यासंदर्भात शासनाच्या पुरवठा विभागाने ही त्याची दखल घेतली आहे. क्लाऊड सर्वर यंत्रणेत दोष येत असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी याबाबत संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय अन्य सुरक्षा योजनेतील कोणीही धान्यांपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT